नवी दिल्ली: केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांना काल पदावरुन तडकाफडकी हटवण्यात आलं आहे. आता कायदा मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. तर किरेन रिजिजू यांच्याकडून कायदा मंत्रालय काढून पृथ्वी विज्ञान मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
न्यायालयीन नियुक्त्यांमध्ये केंद्र सरकारच्या अधिकारांवर न्याययंत्रणेने आक्रमण केल्याचा दावा करून किरेन रिजिजू यांनी अनेकदा जाहीर टीका केली होती. यंदाच्या वर्षी विविध राज्यांत विधानसभेच्या निवडणुका आहेत. न्याययंत्रणांबाबत झालेल्या वादांबाबत केंद्र सरकार चिंतित असल्याचं बोलले जात आहे. किरेन रिजिजू यांची बदली झाल्यानंतर विरोधकांनी देखील त्यांच्यावर टीका केली होती. यावर आता किरेन रिजिजू यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
किरेन रिजिजू यांनी आज पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी ते म्हणाले की, विरोधक नक्कीच माझ्यावर टीका करतील आणि विरोधकांनी माझ्या विरोधात बोलणे, टीका करणे ही गोष्ट माझ्यासाठी नवीन नाही. माझी बदली ही काही शिक्षा नाही, ही सरकारचा प्लॅन आहे. ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दृष्टी आहे, असं किरेन रिजिजू यांनी सांगितले.
न्यायालयाचे निकाल अन् धक्के
विधिमंत्री हा केंद्र सरकार व न्याययंत्रणा यांना जोडणारा दुवा असतो. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि किरण रिजिजू यांच्यातील संवाद बंद झाला होता, अशी सूत्रांनी माहिती दिली. दिल्लीतील आप सरकार व नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांच्यातील वादाच्या खटल्याचा न्यायालयाने दिलेला निकाल सरकारसाठी धक्का होता. शिंदे गट-भाजप यांच्या सरकारला न्यायालयाने दिलासा दिला असला तरी राज्यपालांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले होते.