मुंबई - गेल्या काही दिवसांत स्वयंपाकाच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात प्रचंड वाढ झालेली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट बिघडलं असून, सिलेंडरसाठी इतर आवश्यक गोष्टींच्या खर्चामध्ये कपात करावी लागत आहे. मात्र सिलेंडरच्या या महागाईपासून सुटका मिळवण्यासाठी एक पर्याय आहे. तो म्हणजे सोलर स्टोव्ह. सरकारी तेल कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने हा खास स्टोव्ह तयार केला आहे. हा स्टोव्ह सौर उर्जेवर चालतो. तुम्ही हा स्टोव्ह घरी आणून महागड्या गॅस सिलेंडरपासून सुटका मिळवू शकता.
आता तुम्ही विचार करत असाल की, सोलरवर चालणारा हा स्टोव्ह उन्हामध्ये ठेवण्याची गरज भासेल, पण तसं नाही आहे. तुम्ही हा स्टोव्ह किचनमध्ये किंवा कुठेही ठेवून वापरू शकता. इंडियन ऑईलने या सोलर पॉवर्ड स्टोव्हला सूर्य नूतन असं नाव दिलं आहे. हल्लीस केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह आणि हरदीप सिंह पुरी यांनी या स्टोव्हची पडताळणी केली होती. केंद्रीय मंत्र्यांनी या स्टोव्हचं कौतुक केलं होतं.
या सूर्य नूतन सोलर स्टोव्हची खासियत म्हणजे. तो तुम्ही एकाच ठिकाणी कायमस्वरूपी लावू शकता. तसा तो कुठेही लावू शकता. हा एक रिचार्जेबल आणि इनडोअर सोलर कुकिंग सिस्टिम आहे. हा स्टोव्ह इंडियन ऑईलच्या संशोधन आणि विकास केंद्र, फरिदाबादने विकसित केला आहे. इंडियन ऑईलने याचं पेटंटही घेतलं आहे.
सूर्य नूतन सोलर स्टोव्हचे दोन यूनिट आहेत. एक स्टोव्ह आहे जो तुम्ही किचनमध्ये लावू शकता. तर दुसरं युनिट हे उन्हामध्ये राहतं. तसेच चार्ज करताना ऑनलाईन कुकिंग मोड प्रदान करतो. त्याशिवाय चार्ज झाल्यानंतरही याचा वापर करता येतो. या सोलर स्टोव्हच्या प्रीमियम मॉडेवर चार जणांच्या कुटुंबासाठी संपूर्ण भोजन (नाश्ता+दुपारचं भोजन+रात्रीचे भोजन) तयार होते.
या सोलर स्टोव्हची किंमत १२ हजार रुपयांपासून सुरू होते. या बेस मॉडेलची किंमत २३ हजार रुपये आहे. मात्र इंडियन ऑईलचे सांगणे आहे की, येणाऱ्या काळात याच्या किमतीमध्ये घट होऊ शकते.