श्रीनगर: यंदाची सर्वांत मोठी घुसखोरी सुरक्षा दलांनी उधळून लावली असून यावेळी झालेल्या चकमकीत पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर (एलओसी) ही चकमक झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. घुसखोरी होणार असल्याची गुप्त माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी उत्तर काश्मीर जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळील जुमागुंड भागात कारवाई सुरू केली. शुक्रवारी पहाटे मोठी चकमक झाली.
१३ जून रोजी कुपवाडा जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळील डोबनार मच्छल भागात लष्कर आणि पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत दोन दहशतवादी ठार झाले होते.
चकमकीत पाच विदेशी दहशतवादी मारले गेले. परिसरात शोध सुरू आहे. कुपवाडा भागात या वर्षातील ही पहिलीच मोठी घुसखोरी होती. भारतीय सुरक्षा दलाने ती हाणून पाडली. -विजय कुमार, अतिरिक्त पोलिस महासंचालक, काश्मीर