नवी दिल्ली: १५ ऑगस्ट हा दिवस दरवर्षी विशेष आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस असला तरी यंदाचा स्वातंत्र्यदिन काहीसा खास असणार आहे. ७७व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर होणाऱ्या कार्यक्रमात १८०० विशेष पाहुणे सहभागी होणार आहेत. शासनाच्या 'जनभागीदारी' कार्यक्रमांतर्गत या विशेष पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
लाल किल्ल्यावर आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलेल्या १८०० लोकांमध्ये ६६० व्हायब्रंट गावांच्या ४०० सरपंचांचा समावेश आहे. याशिवाय शेतकरी उत्पादन संस्थांशी संबंधित २५० लोक, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि प्रधानमंत्री कौशल विकास योजनेचे ५०-५० लाभार्थी, सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प आणि नवीन संसद भवनाच्या बांधकामात योगदान देणारे ५० श्रमयोगी, सीमेवर रस्ते बांधणी, पाणी पुरवठा कामगार, ५० खादी कामगार, अमृत सरोवर बांधणारे ५० कामगार आणि हर घर जल योजनेत काम करणारे ५० कामगार, ५० प्राथमिक शाळेतील शिक्षक, परिचारिका आणि मच्छीमार १८०० विशेष पाहुण्यांचा समावेश आहे.
संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, लष्कर, हवाई दल आणि दिल्ली पोलिसांच्या तुकडीमध्ये एक अधिकारी आणि २५ जवानांचा समावेश असेल, जे पंतप्रधानांना सलामी देतील. त्याचवेळी भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि २४ सैनिक पंतप्रधानांना गार्ड ऑफ ऑनर देतील. गार्ड ऑफ ऑनरचे नेतृत्व मेजर विकास सांगवान करतील. स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मेरी माती, मेरा देश मोहीम सुरू केली आहे. देशातील शूर स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. याअंतर्गत देशभरात स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यासोबतच सरकार 'हर घर तिरंगा अभियान'ही राबवत असून, त्याअंतर्गत देशभरात राष्ट्रध्वज फडकवला जाणार आहे.