ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 15 - भाजपाचे माजी खासदार नवज्योत सिंग सिद्धू यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. नवी दिल्ली येथे राहुल गांधी यांच्या घरी जाऊन त्यांनी काँग्रेस पक्षाचे सदस्यत्व स्विकारले आहे. पंजाबमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिद्धू यांच्या पक्षातील प्रवेशामुळे काँग्रेस पक्षाला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. काल काँग्रेसचे अमरिंदर सिंग यांनी लवकरच सिद्धू काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले होते.
पंजाब विधानसभा निवडणुकीत सिद्धू अमृतसर मधून निवडणुक लढवण्याची शक्यता आहे. राज्यभरात काँग्रेसच्या प्रचाराची जबाबदारी त्यांच्यावर असेल असे नवज्योत कौर यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, यापूर्वी सिद्धू भाजप पक्षावरील नाराजी व्यक्त केली होती. पक्ष माझ्याकडे दुर्लक्ष करीत असून देशातील तरुणांची सेवा करण्याची संधी पक्षनेतृत्वाने दिली नसल्याची भावना नवज्योत सिद्धूनं व्यक्त केली होती. भाजपला आणि देशाला द्यावे असे माझ्याकडे बरेच काही होते; मात्र पक्षाला मला पंजाब निवडणुकीपासून दूर ठेवायचं असल्यानं मी राजीनामा दिल्याचं यावेळी नवज्योत सिंग सिद्धूनं स्पष्ट केले होते