नवी दिल्ली : संसदेच्या लोकलेखा कमिटी अर्थात पीएसीच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. व्ही. थॉमस यांची रविवारी फेरनियुक्ती करण्यात आली. थॉमस यांना एप्रिल २०१६ पर्यंत पीएसी अध्यक्षपदी पुन्हा नियुक्त करण्यात आले असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.महत्त्वाच्या वित्त कमिट्यांमध्ये पीएसी ही सर्वांत महत्त्वाची कमिटी मानली जाते. १९६७ पासून या कमिटीच्या अध्यक्षपदी मुख्य विरोधी पक्षातील सर्वांत ज्येष्ठ सदस्याची नियुक्ती करण्याचा पायंडा आहे.महालेखापाल अर्थात कॅगचा अहवाल संसदेत सादर झाल्यानंतर लोकलेखा समिती त्या अहवालांची चौकशी करते. या समितीचे दरवर्षी गठन केले जाते. लोकलेखा समितीत अधिकाधिक २२ सदस्य असतात. यामध्ये १५ लोकसभेचे आणि सातहून अधिक राज्यसभेचे असू शकत नाहीत. समितीच्या सदस्यपदी लोकसभेच्या सदस्यांची निवड होते, तर राज्यसभेचे प्रतिनिधी नियुक्त केले जातात. मंत्र्यांचा या समितीत समावेश असू शकत नाही. (लोकमत न्यूूज नेटवर्क)
थॉमस पुन्हा पीएसीचे अध्यक्ष
By admin | Published: May 10, 2015 11:46 PM