राजकोट : पाकिस्तानच्या अटकेतून सुटून आलेल्या ११० मच्छिमारांचे वेरावळ येथे भारावलेल्या वातावरणात स्वागत करण्यात आले. आपल्या प्रियजनांना भेटताना सर्वांच्याच डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले होते. पाकिस्तानने सौहार्दाच्या भावनेतून भारताच्या २२० मच्छिमारांची २५ डिसेंबर रोजी सुटका केली असून, त्यापैकी ११० जणांची पहिली तुकडी अमृतसर येथून वेरावळ येथे पोहोचली तेव्हा सर्वच जण भारावून गेले होते. खोल समुद्रात मासेमारीसाठी जाताना अनिश्चिततेची टांगती तलवार कायम असते. आम्हाला पाककडून पकडले जाते तेव्हा आमच्या कुटुंबियांना त्रास भोगावा लागतो, असे भागा सोळंकी यांनी सांगितले. पाकच्या ताब्यातून सुटलेल्या मच्छिमारांमध्ये त्यांचाही समावेश आहे. आम्हाला सोडतील, याबाबत काहीच खरे नव्हते. १५ महिन्यांपूर्वी मला माझ्या मुलाबरोबर पाकने पकडले होते. पाकने पकडताच मी आजारी पडलो. आता मी सुटलो पण मुलगा कधी सुटेल, हे माहिती नाही, असे सोळंकी म्हणाले. पाकने दुसऱ्यांदा पकडलेले व सुटून आलेले भाना एभा म्हणाले की, मी आता सुटून आलो असलो तरी मासेमारीशिवाय आमच्याकडे उदरनिर्वाहाचा दुसरा मार्गच नाही. (वृत्तसंस्था)
‘त्या’ ११० मच्छीमारांचे गुजरातमध्ये स्वागत
By admin | Published: December 31, 2016 2:06 AM