सॅम पित्रोदा यांचे ते वैयक्तिक विचार, पक्षाचा संबंध नाही; वाद वाढल्यानंतर काँग्रेसचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 18:03 IST2025-02-17T18:02:57+5:302025-02-17T18:03:23+5:30
ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी चीनबाबत केलेल्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

सॅम पित्रोदा यांचे ते वैयक्तिक विचार, पक्षाचा संबंध नाही; वाद वाढल्यानंतर काँग्रेसचे स्पष्टीकरण
Sam Pitroda Statement : काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी भारत आणि चीनच्या संबंधावर केलेल्या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या विधानावरुन भाजप नेते काँग्रेसवर टीका करत आहेत. अशा परिस्थितीत, काँग्रेसने मात्र स्वतःला या वक्तव्यापासून दूर ठेवले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार जयराम रमेश यांनी सोमवारी (17 फेब्रुवारी 2025) एक निवेदन जारी केले आणि चीनबद्दल सॅम पित्रोदा यांनी व्यक्त केलेले विचार, हे पक्षाचे अधिकृत विचार नाहीत, असे स्पष्ट केले.
श्री सैम पित्रोदा द्वारा चीन पर व्यक्त किए गए कथित विचार निश्चित रूप से भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के विचार नहीं हैं।
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) February 17, 2025
चीन हमारी विदेश नीति, बाह्य सुरक्षा, और आर्थिक क्षेत्र की सबसे बड़ी चुनौती बना हुआ है। कांग्रेस पार्टी ने चीन के प्रति मोदी सरकार के दृष्टिकोण पर बार-बार सवाल… pic.twitter.com/fKd6YNqm5D
'हे काँग्रेसचे विचार नाहीत'
जयराम रमेश यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले की, 'ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी व्यक्त केलेले चीनबद्दलचे विचार त्यांचे वैयक्तिक आहेत, त्याचा काँग्रेसशी काही संबंध नाही. आपल्या परराष्ट्र धोरण, बाह्य सुरक्षा आणि आर्थिक क्षेत्रासमोर चीन हे सर्वात मोठे आव्हान आहे. 19 जून 2020 रोजी पंतप्रधानांनी चीनला जाहीरपणे दिलेल्या क्लीन चिटसह मोदी सरकारच्या चीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काँग्रेसने वारंवार प्रश्न उपस्थित केले आहेत.'
सॅम पित्रोदा काय म्हणाले?
ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा म्हणाले की, 'माझा विश्वास आहे की, आता वेळ आली आहे, सर्व देशांनी परस्परांना सहकार्य केले पाहिजे. आमचा दृष्टीकोन सुरुवातीपासूनच संघर्षपूर्ण राहिला आहे आणि या दृष्टिकोनातून असे शत्रू निर्माण होतात, ज्यांना देशातून पाठिंबा मिळतो. आपण ही पद्धत बदलली पाहिजे आणि पहिल्या दिवसापासून चीन हा शत्रू आहे, असे मानणे बंद केले पाहिजे. हे केवळ चीनसाठीच नाही, तर सर्वांसाठी अन्यायकारक आहे. आता वेळ आली आहे की, आपण संभाषण वाढवायला हवे,' असे सॅम पित्रोदा म्हणाले.