धार - पुलवामा हल्ल्याला जे लोक अपघात बोलतात, ते लोक दहशतवादी ओसामा बिन लादेनला शांतीदूत मानतात असा जोरदार हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्यादिग्विजय सिंह यांच्यावर केला. मंगळवारी मध्यप्रदेशातील धार येथे भारतीय जनता पार्टीकडून विजय संकल्प रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मोदी यांनी दिग्विजय सिंह यांच्यावर नाव न घेता जोरदार हल्ला चढविला.
गेल्या काही दिवसांपासून पुलवामा हल्ल्याचे राजकारण होताना पाहायला मिळत आहे. काँग्रेस नेत्यांकडून एअर स्ट्राईकमध्ये किती दहशतवादी मारले गेले याचा पुरावा देण्याची मागणी केली गेली त्या पार्श्वभुमीवर मोदी यांनी काँग्रेसला टीकेचे लक्ष्य केले. ज्या पक्षाने इतकी वर्षे देशावर राज्य केले. ज्या पक्षाच्या नेत्याने आपल्या पराक्रमी सैन्याचे हात बांधून ठेवले त्यांचेच नेते आज सैन्याच्या शौर्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. त्याच पक्षाचे मध्यप्रदेशातील महाशय नेते यांना पुलवामा हल्ला फक्त अपघात वाटतो अशी टीका मोदी यांनी दिग्विजय सिंह यांच्यावर नाव न घेता केली.
यापुढे नरेंद्र मोदी म्हणाले की, या लोकांची मानसिकता देशातील लोकांनी समजून घ्यावी, दहशतवाद्यांना वाचविण्यासाठी यांचे नेते पुलवामा हल्ल्याला अपघात बोलतात. पुलवामामध्ये जे झाले तो अपघात होता का असा सवाल त्यांनी उपस्थित लोकांना केला. त्याचसोबत देशातील एका घराण्याचे ते शिलेदार आहेत त्यांना ओसामा बिन लादेनही शांतीदूत वाटतो. या महाशयांनी 26/11 चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला झाला त्यातूनही पाकिस्तानला क्लीनचीट देत चौकशी भरकटविण्याचे काम केले.
दिल्लीच्या बाटला हाऊस एनकाऊंटरचा हवाला देत मोदी यांनी काँग्रेसवर प्रहार केले. काँग्रेसकडून दहशतवाद्यांविरोधात कारवाई होऊ शकते अशी अपेक्षी करू शकतो का असा प्रश्न उपस्थित केला. तसेच मोदी पुढे म्हणाले की, आज हे लोक सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकवर शंका उपस्थित करत आहेत, ज्यावेळी यांचे केंद्रात सरकार होते त्यावेळी दहशतवादी हल्ले झाले तरी ते गप्प बसून राहत होते. एअर स्ट्राईक पाकिस्तानात झाली मात्र त्याचे दुख: भारतातील काही लोकांना झाले असा आरोप मोदी यांनी केला.
पाकिस्तानी टीव्हीवरचे हे पोस्टर बॉय
विरोधी पक्षातील लोकांचे चेहरे पहा, मागील काही दिवसांपासून यांचे चेहरे पडलेले दिसत आहेत जसे यांच्यावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. आपल्या फायद्यासाठी पाकिस्तानची भाषा हे बोलत होते. मोदीला शिव्या दिल्याने पाकिस्तानात टाळी वाजते, पाकिस्तानी मिडियात यांचे चेहरे झळकले जातात, सध्या हे लोक पाकिस्तानचे पोस्टर बॉय म्हणून प्रसिध्द झालेत. एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानची बोलती बंद झाली, पाकिस्तानचे पितळ उघडे पडले त्यामुळे हे लोक आता समोर येत आहेत. पुरावे मागत आहेत असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांवर केला.