गोंधळ घालणाऱ्या खासदारांना उत्तर देण्याची गरज नाही; ओम बिर्लांचे सर्व मंत्र्यांना निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 05:32 PM2024-12-04T17:32:31+5:302024-12-04T17:34:23+5:30
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दररोज तुतू-मैमै पाहायला मिळत आहे.
नवी दिल्ली : सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात दररोज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुतू-मैमै पाहायला मिळत आहे. बुधवारी(दि.4)देखील लोकसभेत गदारोळ झाला. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांनी मंत्र्यांना एक सल्ला दिला. 'ज्या सदस्यांना खुर्चीवर बसून बोलण्याची परवानगी नाही, त्यांना मंत्र्यांनी उत्तर देण्याची गरज नाही,' असे बिर्ला म्हणाले. प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान ऊर्जा मंत्रालयाशी संबंधित प्रश्न विचारले जात असताना त्यांनी ही टिप्पणी केली.
विभागाचे मंत्री प्रल्हाद जोशी एका पुरवणी प्रश्नाला उत्तर देत असताना समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी खाली बसून काही टिपण्णी केली, ज्याच्या उत्तरात वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी उत्तर दिले. यावर बिर्ला म्हणाले, मंत्र्यांना विनंती आहे की, ज्यांना (सदस्यांना) बोलण्याची परवानगी दिली नाही, त्यांना उत्तरे देण्याची गरज नाही.
ओम बिर्ला मंत्र्यांवर कशामुळे चिडले?
संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी मंगळवारी लोकसभेत शून्य तास सुरू होण्यापूर्वी अजेंड्यात विविध मंत्र्यांची नावे असलेली कागदपत्रे सादर केल्याबद्दल नाराजी ओम बिर्लांनी नाराजी व्यक्त केली. महत्वाच्यावेळी मंत्री उपस्थित नसल्यामुळे बिर्ला नाराज झाले आणि संबंधित मंत्र्यांनी सभागृहात उपस्थित राहाणे गरजेचे असल्याची टिप्पणी केली. दरम्यान, सभागृहात मंत्री उपस्थित नसतात, तेव्हा प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर दुपारी 12 वाजता विषयपत्रिकेत नमूद केलेली आवश्यक कागदपत्रे संबंधित मंत्र्याच्या वतीने सभागृहाच्या टेबलावर ठेवली जातात.
तुम्ही एकमेकांना समजावून सांगू नका
सभागृहात आवश्यक फॉर्म सादर करताना संसदीय कामकाज राज्यमंत्री मेघवाल यांनी वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितिन प्रसाद यांच्या नावाचा कागदपत्र ठेवला. यावेळी बिर्ला म्हणाले की, उद्योगमंत्री पियुष गोयल सभागृहात बसले होते आणि त्यांना कागदपत्रे सादर करण्यास सांगायला हवे होते. यानंतर गृहराज्यमंत्री बंडी संजय कुमारांना त्यांच्या नावाची कागदपत्रे सभागृहाच्या टेबलवर मांडायची होती, पण काही अडचण आल्यामुळे इतर मंत्री त्यांना समजावून सांगू लागले. त्यावर बिर्लांनी, एकमेकांना समजावून सांगू नका, असे म्हटले.