ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 - लेखिका शोभा डे यांनी मंगळवारी मतदान केल्यानंतर पोट सुटलेल्या एका लट्ठ पोलिसाचा फोटो ट्विट करून मुंबई पोलिसाची खिल्ली उडवली होती. ट्विट केलेला फोटो हा मुंबई पोलिसाचा नाही असं उत्तरही मुंबई पोलिसांनी शोभा डेंना दिलं होतं.
दौलतराम जोगावत असं त्या पोलिसाचं नाव असून ते मध्य प्रदेश पोलिसात पोलीस निरिक्षक पदावर कार्यरत आहेत. हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार जोगावत यांनी डेंना उत्तर देत माझं वजन मी जास्त खातो म्हणून वाढलेलं नाही तर इन्स्युलिनच्या असमतोलामुळे आहे असं म्हटलं आहे. डे यांच्या ट्विटमुळे दुखावलेले जोगावत म्हणाले, शोभा डे यांची इच्छा असेल तर त्या माझ्यावरील उपचाराचा खर्च उचलू शकतात, बारीक व्हायला कोणाला नाही आवडत?
यापुर्वी शोभा डे यांच्या मुंबई पोलिसांची खिल्ली उडवणा-या ट्विटला मुंबई पोलिसांनी जशास तसे उत्तर दिलं होतं. मंगळवारी मतदान केल्यानंतर शोभा डे यांनी पोट सुटलेल्या एका जाडजुड पोलिसाचा फोटो ट्विट केला होता. त्यावर 'Heavy Police Bandobast In mumbai today', असे पोलिसांची खिल्ली उडवणारे कॅप्शनही टाकले. यानंतर सोशल मीडियावर हा फोटो काही क्षणातच व्हायरल झाला. या ट्विटची माहिती पोलिसांना समजली. काहीही संबंध नसलेला फोटो ट्विट करुन शोभा डे मुंबई पोलिसांची बदनामी करत असल्याने त्यांनी अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन प्रत्युत्तर देऊन शोभा डेंची बोलतीच बंद केली.
'मस्करी करायला आम्हालाही आवडते. गणवेशासहीत फोटोतील पोलीस कर्मचारी आमचा नाही. तुमच्यासारख्या जबाबदार नागरिकांकडून आम्हाला चांगल्या गोष्टी अपेक्षित आहे', असा टोला मुंबई पोलिसांनी शोभा डे यांना हाणला.