ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 14 - आयुष मंत्रालयाने गर्भवती महिलांना दिलेल्या बुकलेटमधल्या सूचनांवरून आता कोलांटीउडी घेतली आहे. सेक्स न करण्याचा सल्ला आमच्याबुकलेटमध्ये दिला नाही, असे स्पष्टीकरण आयुष मंत्रालयाने दिले आहे. तसेच मांस खाणं टाळावे हा सल्ला आयुर्वेदातही दिला जातो, असेही बुकलेटमध्ये म्हटलं आहे. आमच्या बुकलेटमध्ये आयुर्वेद आणि योगासंबंधी माहिती उपलब्ध करून दिली आहे. अशा बातम्यांना प्रसिद्धी मिळावी म्हणून आयुष मंत्रालयाचे नाव पुढे केल्याचा दावाही केंद्रानं केला आहे. तत्पूर्वी पंतप्रधान कार्यालयानं गर्भवती महिलांसाठी एक विशिष्ट प्रकारची सूचना प्रसिद्धीस दिली होती. या सूचनेनुसार गर्भवती महिलांनी सदृढ बाळाला जन्म देण्यासाठी सेक्स करणं आणि मांस खाणं टाळलं पाहिजे. तसेच स्वतःच्या डोक्यातही शुद्ध आणि सकारात्मक विचार ठेवावेत, असंही आयुष मंत्रालयानं प्रसिद्धीस दिलेल्या बुकलेटमध्ये म्हटलं होतं.
गर्भवती महिलांनी स्वतःच्या रूममध्ये सुंदर सुंदर फोटो लावावेत, असा सल्लाही दिला होता. मोदी सरकार दिवसेंदिवस कोणत्या ना कोणत्या गोष्टींसाठी कायम चर्चेत असते. मात्र आता मोदी सरकारनं जे गर्भवती महिलांसाठी सूचनांचं प्रसिद्धीपत्रक जाहीर केलं होतं, त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. मंत्रालयाच्या आयुष प्रीस्क्रिप्शनने गर्भवती महिलांना हा सल्ला दिला होता. गर्भवती महिला सृदृढ बाळाला जन्म द्यायचा असल्यास त्यांनी कटाक्षानं घाणेरडे विचार आणि मांस खाणे टाळलं पाहिजे. तसेच गर्भवती असताना सकारात्मक आणि शुद्ध विचार करण्याची गरज आहे, असंही आयुष प्रीस्क्रिप्शनने म्हटलं होतं. आरोग्य मंत्रालयाच्या आयुष प्रीस्क्रिप्शनमध्ये जवळपास दरवर्षी 2.6 कोटी मुलं जन्माला येतात. आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी हे प्रसिद्धीपत्रक जाहीर केलं असून, ते आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त परदेशात निघून गेले आहेत. या प्रसिद्धीपत्रकावर आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांची प्रतिक्रिया अद्याप प्राप्त झाली नाही. तसेच त्यांनी स्वतःचा मोबाईलही बंद ठेवला आहे.