फरिदाबाद - जे लोक विकासाची मागणी करतात, त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल, असं वक्तव्य अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केलं आहे. विकासासाठी पैशांची गरज असते, ज्यांना देशात विकास पाहिजे आहे, त्यांना त्या विकासासाठी किंमत तर मोजावीच लागेल, असं जेटली म्हणाले. नॅशनल अकॅडमी ऑफ कस्टम एक्साइज अँड नार्कोटिक्स संस्थेच्या कार्यक्रमात ते बोलत होते.जेटली म्हणाले, जीएसटीच्या माध्यमातून सर्व करांना एकत्रित केले असून, या बदलाची व्यवस्थेत सरमिसळ झाल्यास अर्थव्यवस्थेला गती मिळेल. कराच्या मर्यादेत जास्तीत जास्त लोकांना आणण्यासाठी प्राप्तिकर विभागानंही प्रयत्न करायला हवेत. अप्रत्यक्ष करामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळत असून, जीवनावश्यक वस्तूंवर कर कमी लावण्याचा निर्णय घेतल्याचंही जेटलींनी सांगितलं आहे.महसूलही सरकारची गरज आहे. महसुलाद्वारेच विकसनशील देशाला विकसित देश म्हणून नावारूपाला आणता येईल. ज्या देशात लोक स्वत: हून वेळेवर कर भरण्यास पुढाकार घेतात. तो देश नक्कीच प्रगती करतो, असंही जेटली म्हणाले आहेत.
विकासाची मागणी करणा-यांना किंमत मोजावीच लागेल- जेटली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2017 7:04 PM