आता भीक देणाऱ्यांवरही दाखल होणार एफआयआर, प्रशासनाकडून मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 20:43 IST2024-12-16T20:41:44+5:302024-12-16T20:43:10+5:30
इंदूरला भिकारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

आता भीक देणाऱ्यांवरही दाखल होणार एफआयआर, प्रशासनाकडून मोठा निर्णय
इंदूर : मध्य प्रदेशातील इंदूर शहरात प्रशासनाकडून एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. १ जानेवारी २०२५ पासून इंदूरमध्ये भिकाऱ्यांना भिक्षा देणाऱ्या लोकांवरही एफआयआर दाखल केला जाणार आहे. यासंबंधीची माहिती सोमवारी (दि.१६) शहरातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिली आहे.
इंदूरला भिकारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. इंदूर शहरात १ जानेवारी २०२५ पासून भिक्षा देणाऱ्या लोकांवरही एफआयआर दाखल करण्यात येणार आहे. इंदूरचे जिल्हाधिकारी आशिष सिंह म्हणाले, "भीक मागण्याविरुद्ध आमची जनजागृती मोहीम या महिन्याच्या अखेरपर्यंत (डिसेंबर) शहरात चालणार आहे. येत्या १ जानेवारीपासून कोणी भिक्षा देताना आढळल्यास, त्याच्याविरुद्धही एफआयआर दाखल केला जाईल."
प्रशासनाने यापूर्वीच शहरात भीक मागण्यावर बंदी घालण्याचे आदेश जारी केले आहेत, असे इंदूरचे जिल्हाधिकारी आशिष सिंह यांनी सांगितले आहे. ते म्हणाले, "मी इंदूरच्या सर्व लोकांना आवाहन करतो की, लोकांना भिक्षा देण्याच्या पापात सहभागी होऊ नका." तसेच, गेल्या अनेक महिन्यांत शहर प्रशासनाने भीक मागणाऱ्या वेगवेगळ्या टोळ्यांचा पर्दाफाश केल्याची माहिती जिल्हाधिकारी आशिष सिंह यांनी दिली आहे.
केंद्र सरकारचा पायलट प्रोजेक्ट
जिल्हाधिकारी आशिष सिंह म्हणाले की, प्रशासनाने भीक मागत असलेल्या अनेकांचे पुनर्वसन केले आहे. केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने एक पायलट प्रोजेक्ट सुरू केला आहे. याअंतर्गत देशभरातील १० शहरे भिकारीमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये इंदूरचाही समावेश करण्यात आला आहे.