लखनौ - गुजरातमधून उत्तर भारतीयांना हुसकावून लावण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी मोदींना लक्ष्य केलं आहे. ज्या नागरिकांनी मोदींना वाराणसीतून निवडून दिले, मोदींसाठी मतदान केले, त्याच नागरिकांना गुजरातमध्ये टार्गेट करण्यात येत आहे. ही अत्यंत दुर्दैवी घटना असून गुजरातमधील उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही मायावती यांनी केली.
गुजरातमध्ये युपी-बिहारी किंवा उत्तर भारतीय नागरिकांविरुद्ध आक्रोश निर्माण झाला आहे. गुजरातच्या साबरकांठा येथे 28 सप्टेंबर रोजी 14 महिन्यांच्या चिमुकलीवर एका बिहारी कामगाराने बलात्कार केला होता. त्यानंतर नेहमीच शांत, संयमी असलेल्या गुजरातींचाही राग अनावर झाला. त्यामुळे युपी-बिहारी नागरिकांना गुजरात सोडून देण्याचा इशारा देण्यात आला. विशेष म्हणजे गुजरातमधील 11 जिल्ह्यात ही मोहीम तीव्र झाली असून अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत 50 हजार उत्तर भारतीयांनी गुजरात सोडल्याची माहिती आहे.
गुजरातमध्ये होत असलेल्या उत्तर भारतीयांवरील हाणामारीच्या घटनेवरुन मायावती यांनी मोदींना लक्ष्य केलं. मोदींनी गुजरातमध्ये लक्ष द्यावे. गुजरात सरकारने संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी मायावती यांनी केली आहे. दरम्यान, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी गुजराती लोकांना शांततेचं आवाहन केलं आहे. तसेच कुठल्याही हिंसाचारात सहभागी न होण्याचे बजावले आहे. दरम्यान, मायावतींसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, नितिश कुमार, केंद्रीयमंत्री राम विलास पासवान यांनीही रुपानी यांना फोन करुन याप्रकरणी चिंता व्यक्त केली आहे.