चंद्रयान-३ च्या लँडिंगसाठी अवघा भारत देश उत्सुक असून, सर्वांना बुधवारी सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी होणाऱ्या ऐतिहासिक घटनेची प्रतीक्षा लागली आहे. आतापर्यंत अनेकवेळा देदीप्यमान कामगिरी करणाऱ्या इस्रोने जागतिक अवकाश क्षेत्रात बळकट स्थान निर्माण केले आहे. १९७५ मध्ये प्रायोगिक तत्त्वावर पाठवण्यात आलेल्या आर्यभट्ट सॅटेलाईटपासून सुरू झालेला प्रवास भविष्यातील अनेक मोहिमांच्या तयारीपर्यंत येऊन ठेपला आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रत्येक भारतीयांचे आयुष्य सुखी-समाधानी करणाऱ्या इस्रोच्या कामगिरीविषयी...
पहिल्या उड्डाणाची गोष्ट
- देशातील पहिली अवकाश संशोधनविषयक संस्था ‘भौतिक संशोधन प्रयोगशाळे’ची उभारणी अहमदाबाद येथे झाली.
- तेथे डॉ. विक्रम साराभाई यांनी केलेल्या संशोधनाला रशिया आणि अमेरिकेचेही सहकार्य मिळाले होते. त्यातूनच २१ नोव्हेंबर १९६३ रोजी ‘नाईके अपाचे’ या अमेरिकन रॉकेटने केरळच्या थुंबा येथून यशस्वी उड्डाण केले.
- ज्या जागेवरून हे उड्डाण केले तेथील सेंट मॅगडेलीन चर्च आता विक्रम साराभाई म्युझियम म्हणून ओळखले जाते.
इस्रोची स्थापना कधी?
तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि संशोधक डॉ. विक्रम साराभाई यांच्या संकल्पनेतून भारत सरकारने अवकाश संशोधनासाठी इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्चची १९६२ मध्ये स्थापना केली. त्यातूनच पुढे १५ ऑगस्ट १९६९ रोजी इस्रोची स्थापना झाली. १९७५ मध्ये इस्रोला विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत आणण्यात आले.
आर्यभट्ट ठरले पहिले स्वदेशी सॅटेलाईट
भारताने स्वतः विकसित केलेल्या पहिल्या प्रायोगिक सॅटेलाईट आर्यभट्टचे प्रक्षेपण १९ एप्रिल १९७५ रोजी केली.
इस्रोकडून प्रक्षेपित उपग्रह
- संवाद (कम्युनिकेशन) ४३
- पृथ्वीनिरीक्षण ४१
- वैज्ञानिक संशोधन ४
- नेव्हिगेशन ८
- प्रायोगिक ९
- लघुउपग्रह २
- विद्यार्थी उपग्रह १५
- परदेशी उपग्रह (३४ देश) ४३१
आपल्याला काय मिळाले?
- टेलिव्हिजन, रेडिओ सेवा : इस्रोने प्रक्षेपित केलेल्या इन्सॅट श्रेणीतील विविध उपग्रहांमुळे देशात घरोघरी टीव्ही पोहोचण्यास मदत झाली. रेडिओ सेवांसाठीही उपग्रहाची मदत झाली. जीसॅट-२४ उपग्रहांमुळे डायरेक्ट टू होम सेवा देशभरात पोहोचली.
- दूरसंचार सेवा : डिजिटल इंडियाअंतर्गत खेडोपाडी इंटरनेट पोहोचवण्यासाठी जीसॅट-११ उपग्रह महत्त्वाचे योगदान देत आहे.
- हवामान सेवा : इन्सॅट ३डी आणि इन्सॅट ३डीआर या उपग्रहांचा वापर हवामानविषयक अंदाज व्यक्त करण्यासाठी केला जातो.