नवी दिल्ली - काश्मीर खोऱ्यातील बँक कर्मचाऱ्याच्या हत्येवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) यांनी गुरुवारी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ज्यांना काश्मिरी पंडितांचे संरक्षण करायचे आहे. त्यांना चित्रपटाच्या प्रमोशनमधून वेळ मिळत नाही, असा गंभीर आरोप त्यांनी केला. भारतीय जनता पक्षाने (भाजपा) काश्मीरला केवळ सत्तेची शिडी बनवल्याचा दावाही त्यांनी केला. राहुल गांधी यांनी याआधी देखील विविध मुद्द्यांवरून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
ऱाहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. यामध्ये "बँक मॅनेजर, शिक्षक आणि अनेक निष्पाप लोक रोज मारले जात आहेत, काश्मिरी पंडित पळून जात आहेत. ज्यांना त्यांचे संरक्षण करायचे आहे, त्यांना चित्रपटाच्या प्रमोशनमधून वेळ मिळत नाही. भाजपाने काश्मीरला फक्त आपल्या सत्तेची शिडी बनवलं आहे. पंतप्रधानजी, काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी तातडीने पावले उचला" असं राहुल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
नॅशनल हेरॉल्ड या वृत्तपत्राशी संबंधित मनी लाँडरिंगप्रकरणी चौकशीसाठी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, त्यांचे पुत्र व काँग्रेस नेते राहुल गांधी या दोघांना चौकशीसाठी हजर राहण्याबद्दल समन्स बजावले आहे. राहुल गांधी व सोनिया गांधी यांनी ८ जूनला ईडीच्या मध्य दिल्लीतील मुख्यालयात हजर राहावे असे या समन्समध्ये म्हटले आहे.
नॅशनल हेरॉल्ड या वृत्तपत्राचे मालक असलेल्या यंग इंडियन या संस्थेवर गैरव्यवहारांचे आरोप झाले आहेत. तेथील मनी लाँडरिंगप्रकरणी ईडीला सोनिया व राहुल गांधी यांचे जबाब नोंदवून घ्यायचे आहेत. नॅशनल हेरॉल्ड हे वृत्तपत्र असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडकडून प्रसिद्ध केले जाते. या वृत्तपत्रातील गैरव्यवहारप्रकरणी काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे, पवन बन्सल यांची ईडीने नुकतीच चौकशी केली होती.
काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, ईडीने सोनिया गांधी व राहुल गांधी यांना पाठविलेले समन्स हे केंद्र सरकारच्या डावपेचांचा भाग आहे. या संकटावर काँग्रेस पक्ष आपल्या कार्यकर्त्यांच्या भक्कम पाठबळाच्या आधारे निश्चित मात करेल. लोकशाहीवरील हा हल्ला आम्ही परतवून लावू.