'ते' संधिसाधू वृत्तीचे, सोनिया गांधींकडून काँग्रेस नेत्यांना कानमंत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2019 09:14 PM2019-09-12T21:14:09+5:302019-09-12T21:17:03+5:30
काँग्रेस नेत्यांनी थेट जनतेशी जोडलं गेलं पाहिजे, तसेच सोशल मीडियाचा प्रभावी वापर करुन लोकांपर्यत पोहोचणे गरजेचं असल्याचंही सोनिया यांनी म्हटलं आहे.
नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर प्रहार केला आहे. गेल्या काही महिन्यात महाराष्ट्रास देशातील अनेक दिग्गजांनी काँग्रेसमधील आपल्या पदाचा राजीनामा दिला आरहे. तर, महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेत्यांनी काँग्रेसला बाय करुन कमळ आणि शिवसेनेचा भगवा हाती घेतला आहे. पक्षांतराच्या या कोलांटउड्यावरुन सोनिया गांधींनी नेत्यांवर टीका केली आहे. काँग्रेसला बाय करणाऱ्याने नेत्यांनी सोनिया यांनी संधिसाधु असे म्हटले आहे.
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींच्या उपस्थितीत काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला राहुल गांधींची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, काँग्रेसचे महासचिव आणि प्रभारी महासचिवांसाठीच ही बैठक होती, त्यामुळे राहुल गांधी या बैठकीला हजर नसल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. सोनिया गांधींनी हंगामी अध्यक्षपद स्विकारल्यानंतर प्रथमच त्यांच्या उपस्थितीत काँग्रेसची बैठक पार पडली. आगामी तीन राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने ही बैठक घेण्यात आली आहे.
काँग्रेस नेत्यांनी थेट जनतेशी जोडलं गेलं पाहिजे, तसेच सोशल मीडियाचा प्रभावी वापर करुन लोकांपर्यत पोहोचणे गरजेचं असल्याचंही सोनिया यांनी म्हटलं आहे. काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना ओळखण्याची हीच खरी वेळ आहे. आपल्या पक्षाची वेळ खराब असली तरी, आपण संयमाने आणि धीराने सामोरे जायला हवे. देशाला आणि काँग्रेसच्या विचारधारेला मजबूत बनविण्यासाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांनी पक्षात झोकून देऊन काम करायलं हवं. याच काळात आपल्याला काँग्रेस पक्षाचा स्वार्थासाठी वापर करणाऱ्या नेत्यांची ओळख पटणार आहे, असेही सोनिया यांनी म्हटले.
Those who left Congress showed opportunistic character: Sonia Gandhi
— ANI Digital (@ani_digital) September 12, 2019
Read @ANI story | https://t.co/iWQshpFF4xpic.twitter.com/tPNFeJHxw7
सध्या पक्षातील काही नेत्यांनी काँग्रेस सोडून इतर पक्षात प्रवेश केला आहे. या नेत्यांनी त्यांच्या संधिसाधू वृत्तीचा दाखलाच दिला आहे, असे म्हणत पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना सोनिया गांधींनी लक्ष्य केले. सध्या काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी भाजपात प्रवेश केला आहे. तर, उर्मिला मांतोडकर यांनीही काँग्रेस सदस्यपदाचा राजीनामा दिलाय. काही दिवसांपूर्वी राधाकृष्ण विखे पाटलांनीही भाजपात प्रवेश करुन काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलीय. तसेच, गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्रात काँग्रेसला मोठे धक्के बसले आहेत. त्या, पार्श्वभूमीवर सोनिया गांधींनी आपलं मत व्यक्त केलंय.