PM Modi Security Breach Punjab CM Channi: पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी (Punjab CM Charanjit Singh Channi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील झालेल्या त्रुटी प्रकरणात भाजपवरच जोरदार पलटवार केला आहे. त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल (Sardar Vallabh Bhai Patel) यांच्या एका विधानाचा उल्लेख करत केंद्रातील सत्ताधारी पक्ष भाजपवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) याच्यावर निशाणा साधला.
चन्नी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचा एक फोटो ट्विट केला आहे. "ज्यांना कर्तव्यापेक्षा प्राणाची अधिक चिंता आहे, त्यांनी भारतासारख्या देशात मोठी जबाबदारी स्वीकारू नये," असं त्या फोटोसोबत लिहिण्यात आलं आहे. दरम्यान, यापूर्वी त्यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीत पंतप्रधानांची सुरक्षा जाणूनबुजून धोक्यात घातल्याच्या भाजपच्या आरोपांवरही भाष्य केलं होतं.
"त्यांना कोणता धोका होता. त्यांच्यापासून एक किलोमीटरपर्यंतच्या अंतरावरही कोणी नव्हतं. स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेले बहुतांश लोकही पंजाबमधील होते," अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी बोलताना दिली. "हे तथ्यहिन वक्तव्य आहे. हे पंजाबला बदनाम करण्याचं आणि राज्याला अस्थिर करण्यासाठी केलं जात आहे. जर पंतप्रधानांना कोणताही धोका असेल तर पहिली गोळी मी माझ्या छातीवर घेईन. यापेक्षा अधिक मी काय बोलू," असंही चन्नी म्हणाले.