नवी दिल्ली : केंद्रातील सत्ताधारी भाजपच्या ‘द्वेषमूलक अजेंड्या’स जो कोणी विरोध करील, त्यास ‘शहरी नक्षलवादी’ ठरविण्यात येत असल्याची कठोर टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी केली.केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने कोरेगाव भीमा प्रकरणाचा तपास ‘एनआयए’कडे सोपविण्याचा निर्णय घाईघाईने जाहीर केल्यानंतर दुस-याच दिवशी राहुल गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. सरकारची ‘कळसूत्री बाहुली’ म्हणून काम करणारी एनआयए विरोधाचे प्रतीक मिटवू शकणार नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले.राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, ‘जो कोणी द्वेषमूलक अजेंड्यास विरोध करील, तो शहरी नक्षलवादी ठरतो. कोरेगाव भीमा हे प्रतिकाराचे प्रतीक असून सरकारची एनआयए कठपुतळी ते मिटवू शकणार नाही’ २०१८ मध्ये घडलेल्या कोरेगाव भीमा हिंसाचाराच्या चौकशीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक बैठक घेतली होती. त्यानंतर शुक्रवारी काही तासांतच केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास घाईघाईने राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) दिला. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकार संतप्त झाले आहे.
द्वेषाच्या अजेंड्यास विरोध करणाऱ्यांस ठरविले जाते नक्षली - राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2020 1:35 AM