चेन्नई : तामिळनाडूचे उच्च शिक्षण मंत्री पोनमुडी यांनी हिंदी भाषेबाबत वादग्रस्त विधान केले आहे. इंग्रजी ही भाषा म्हणून हिंदीपेक्षा अधिक मौल्यवान आहे, असे ते म्हणाले. तसेच, हिंदी ही ऐच्छिक असली पाहिजे, मात्र अनिवार्य नसावी असे सांगत हिंदी बोलणारे आमच्याकडे पाणीपुरी विकत असल्याचा दावा पोनमुडी यांनी केला आहे.
तामिळनाडूच्या उच्च शिक्षण मंत्री पोनमुडी यांनीही हिंदी भाषेच्या वादात उडी घेतली आहे. भारथिअर विद्यापीठ कोईम्बतूर येथे शुक्रवारी दीक्षांत समारंभात पोनमुडी यांनी संबोधित केले. यावेळी भाषा म्हणून इंग्रजी ही हिंदीपेक्षा अधिक मौल्यवान आहे. हिंदी भाषिक लोक नोकऱ्यांमध्ये गुंतलेले आहेत. कोईम्बतूरमध्ये हिंदी भाषिक पाणीपुरी विकत आहेत, असा टोला पोनमुडी यांनी हिंदी भाषिकांना लगावला.
दरम्यान, पोनमुडी यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील फायदेशीर पैलू लागू करण्याचे आश्वासन दिले, परंतु राज्य सरकार केवळ दोन-भाषा प्रणाली लागू करण्याचा निर्धार असल्याचा दावा केला. दीक्षांत समारंभात तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन. रवी यांच्यासोबत व्यासपीठ शेअर करताना इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून आधीच शिकविली जात असताना हिंदी का शिकली पाहिजे, असा सवाल त्यांनी केला.
याचबरोबर, तामिळनाडू भारतातील शिक्षण व्यवस्थेत आघाडीवर आहे. तमीळ विद्यार्थी कोणतीही भाषा शिकण्यास तयार आहेत. मात्र, हिंदी ही केवळ पर्यायी भाषा असावी, ती अनिवार्य केली जाऊ नये. हिंदीपेक्षा इंग्रजी अधिक मौल्यवान असल्याचे पोनमुडी यांनी व्यंग्यात्मकपणे व्यक्त केले आणि दावा केला की हिंदी भाषिक नोकरी करत आहेत. पोनमुडी म्हणाले, "ते म्हणायचे की तुम्ही हिंदी शिकलात तर तुम्हाला नोकरी मिळेल? असं आहे का! कोइम्बतूरमध्ये आता पाणीपुरी कोण विकतंय हे बघायला मिळतं? एके काळी असं होतं. आता इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे." .