विजयपुरा (कर्नाटक) : पंतप्रधान नरेंद्र मोदी व सत्ताधारी भाजप नेते त्यांच्या भाषणात समाजसुधारक बसवण्णा यांच्याविषयी भरभरून बोलतात; पण त्यांच्या शिकवणीचे अनुसरण करत नाहीत, असा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी येथे केला.
कर्नाटकातील भाजप सरकारला ‘देशातील सर्वांत भ्रष्ट’ सरकार संबोधून ते म्हणाले की, १० मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कर्नाटकात काँग्रेस २२४ पैकी १५० जागा जिंकेल, तर ‘४० टक्के कमीशन घेणाऱ्या भाजप सरकारला’ फक्त ४० जागा मिळतील. राज्यातील भाजप सरकार कंत्राटदारांकडून सरकारी कंत्राटांसाठी ४० टक्के कमिशन घेत असल्याच्या तक्रारी आहेत. त्याचा संदर्भ ते देत होते. येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना ते म्हणाले की, बसवण्णा समाजातील दुर्बल घटकांना मदत करण्याबद्दल बोलले होते, त्यांनी ‘कोट्यधीशांना मदत करा’ असे म्हटले नाही. ‘मी बसवण्णा यांच्या शिकवणीबद्दल वाचले आहे. त्यांनी कुठेही ‘देशाची संपत्ती अदानींना द्या’ असे लिहिलेले नाही.’
‘रोड शो’ला मिळाला प्रचंड प्रतिसादकाँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘रोड शो’ला रविवारी येथे प्रचंड प्रतिसाद मिळाला. रस्त्याच्या दुतर्फा उसळलेल्या गर्दीला त्यांनी हात हलवून अभिवादन केले. यातील अनेक लोक यावेळी ‘राहुल, राहुल’, अशा घोषणा देत होते. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून ‘रोड शो’ची सुरुवात केली.