केंद्रातील मोदी सरकारविरोधात विरोधी पक्षांनी मांडलेल्या अविश्वास प्रस्तावावर लोकसभेमध्ये गेल्या तीन दिवसांपासून चर्चा सुरू आहे. दरम्यान, या चर्चेला आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. यावेळी सुरुवातीपासून मोदींनी काँग्रेससह नव्याने स्थापन झालेल्या इंडिया आघाडीवर हल्लाबोल केला. ज्यांचं स्वत:चं खातेपुस्तक बिघडलंय, तेच माझ्याकडे हिशेब मागत आहेत, असा टोला नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना लगावला आहे.
नरेंद्र मोदी म्हणाले की, राजकारणात काही विरोधी पक्षांनी देशापेक्षा पक्ष महत्त्वाचा असल्याचे आपल्या आचरणातून सिद्ध केलं आहे. यांना गरिबाच्या भुकेची चिंता नाही, तर सत्तेची भूकच यांच्या डोक्यात आहे. यांना युवकांच्या भविष्याची पर्वा नाही, तर स्वत:च्या राजकीय भविष्याची चिंता आहे, असा टोला मोदींनी लगावला.
यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले की, अविश्वास प्रस्तावावर फिल्डिंग विरोधकांनी लावली होती, पण चौकार-षटकार इथूनच लागले. नो कॉन्फिडन्स मोशन वर नो बॉल टाकले गेले. इथून सेन्चरी ठोकली गेली. पण तिथून नो-बॉल पडत गेले. खरंतर हे तयारी करून का येत नाही. आता थोडी मेहनत करा. पाच वर्षं दिली होती मी. २०१८ मध्येच बोललो होतो, २०२३ मध्ये अविश्वास प्रस्ताव घेऊन या... काय अवस्था आहे तुमची? असा चिमटाही मोदींनी काढला.