लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : संसदेची सुरक्षा भेदून घुसखाेरी करणाऱ्या आराेपींनी लाेकसभेत उडी मारण्याच्या याेजनेशिवाय जेल लावून आत्मदहन करण्याचाही विचार केला हाेता. मात्र, ताे विचार नंतर साेडून दिला. दिल्ली पाेलिसांच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात धक्कादायक माहिती दिली.
संसदेत घुसखाेरी केल्याप्रकरणी मुख्य सूत्रधार ललित झा याच्यासह एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी भाजपचे खा. प्रताप सिन्हा यांचाही जबाब नाेंदविण्यात येऊ शकताे. तपासकार्याची माहिती असलेल्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात सांगितले की, आराेपींना त्यांचा संदेश प्रभावशाली पद्धतीने सरकारपर्यंत पाेहाेचवायचा हाेता. लाेकसभेत उडी मारण्याची याेजना निश्चित करण्यापूर्वी त्यांनी शरीराला अग्निराेधक जेल लावून मग पेटवून घेण्याची याेजना आखली हाेती.
मात्र, त्यामुळे माध्यमांचे त्यांच्याकडे जास्त लक्ष गेले असते, असे वाटल्यामुळे ती रद्द केली. संसदेमध्ये पत्रके वाटण्याचाही विचार केला हाेता.
फाेन नष्ट केलेल्या जागेवर नेणारललित झा याला पाेलिस नागाैर येथेही घेऊन जाण्याची शक्यता आहे. बुधवारी ज्या ठिकाणी तो थांबला होता, तेथे त्याला नेऊन तपासणी केली जाईल. याशिवाय इतर आरोपींचे फाेन नष्ट केल्याचा दावा त्याने केला आहे. त्या ठिकाणीही पोलिस त्याला नेऊ शकतात.