नवी दिल्ली : रक्त वाहिन्यांचे आकुंचन रोखण्यासाठी वापरण्यात येणारी नळी (स्टेंट) तयार करणाऱ्यापासून ते रुग्णापर्यंत येते, तेव्हा तिची किमत दहापट झालेली असते, यावर आता अधिकृतरीत्या शिक्कामोर्तब झाले आहे. हा नफा २७० टक्के ते एक हजार टक्के असतो.स्टेंट म्हणजे नळीसारखे उपकरण असते. ते अरूंद अशा मार्गात ठेवले जाते किंवा रक्तवाहिनी उघडी ठेवण्यासाठी वापरले जाते.नॅशनल फार्मास्युटिकल प्रायसिंग अॅथॉरिटीने (एनपीपीए) सोमवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात या स्टेंटच्या व्यापारात वेगवेगळ््या पातळ््यांवर संबंधित असलेले लोक किती नफा (मार्जिन्स) कमावतात, याची माहिती दिली आहे. या सगळ््या व्यवहारात गुंतलेल्या लोकांमध्ये रुग्णालयाचा नफा सर्वात जास्त म्हणजे ६५० टक्के असतो. स्टेंट निर्मात्या कंपन्यांसह रुग्णालये आणि हृदयविकारतज्ज्ञ स्टेंटच्या किमतीवरील नियंत्रणाच्या विरोधात मोठमोठ्याने बोलत असतात हे विशेष. स्टेंटच्या किमतीत सर्वात जास्त वाढ होते ती रुग्णालयांमध्ये. सगळीच रुग्णालये तेवढा नफा कमावतात, असे नाही, परंतु तो ११ टक्के ते ६५४ टक्के या दरम्यान असतो. औषध विरघळवणारा स्टेंट (डीईएस) तयार करण्याचा खर्च हा देशी कंपनीसाठी ८ हजार रुपये आहे आणि विदेशातून आयात केलेल्या डीर्ईएसची किमत पाच हजार रुपयांपासून सुरू होते. भारतात जे स्टेंट्स वापरले जातात, त्यात ९५ टक्के स्टेंट्स हे डीईएस असतात. स्टेंट्सची आयात करणारे किंवा उत्पादक सगळ््यात कमी किंमत आकारतात, पण वितरकाचा व रुग्णालयांचा नफा हा १३ टक्के ते २०० टक्के या दरम्यान असतो, असे या माहितीतून दिसते. (लोकमत न्यूज नेटवर्क) >डिलर्सला होतो सर्वात मोठा नफाबहुतेक कंपन्या या वितरकामार्फत बाजारपेठेवर नियंत्रण ठेवतात. अनेक कंपन्यांचा दावा असतो की, आम्ही मार्केटिंग करताना नीतीमूल्यांचे पालन करतो. डॉक्टरांना दिली जाणारी लाच आणि रुग्णालयांना दिले जाणारे पैसे (कट्स) या बेकायदा मार्केटिंग दलालीची जबाबदारी डिलर्स किंवा वितरकांकडे सोपविली गेली आहे. म्हणून डिलर्सला दिला गेलेला नफा १३ टक्क्यांपासून ते १९६ टक्क्यांपर्यंत असून, त्यात बेकायदा दलालीचे व्यवहारही समाविष्ट आहेत, असे सांगितले जाते.
स्टेंट्सवर एक हजार पट नफा
By admin | Published: January 18, 2017 5:18 AM