सिलिगुडी: नव वर्ष आणि नाताळ साजरा करण्यासाठी सिक्कीममध्ये गेलेल्या हजारो पर्यटकांना तुफान बर्फवृष्टीमुळे अडून पडावे लागले आहे. यामुळे त्यांना बाहेर काढण्यासाठी भारतीय लष्कराने बचावकार्य सुरु केले आहे. जवळपास 1027 पर्यटक अडकले आहेत.
बर्फवृष्टी होत असल्याने त्यांची वाहने जागीच थांबली आहेत. अधिकाऱ्यांनी याची माहिती रविवारी दिली आहे. मोठ्या बर्फवृष्टीमुळे शनिवारी जवाहर लाल नेहरू रोड बंद झाला होता, यामुळे हे पर्यटक चांगू झीलजवळ अडकले होते.
भारतीय सैन्य दलाने त्यांना तेथून बाहेर काढले, तसेच सैन्याच्या तळावर त्यांना रात्रीच्यावेळी राहण्यासाठी जागा दिली. रविवारी हवामानात काहीसा बदल झाला आहे. पर्यटकांना छोट्या छोट्या गटात विभागण्यात आले असून त्यांना 40 किमी दूर असलेल्या गंगटोकला पायी पोहोचण्यासाठी मार्गदर्शन केले जात आहे. अद्याप बचाव कार्य सुरु आहे.
हे बचाव कार्य सोमवारीदेखील सुरु राहण्याची शक्यता या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. हे पर्यटक ख्रिसमसच्या सुट्ट्यांमुळे चीनच्या सीमेला लागून असलेल्या सोंगमोच्या चांगू तलावाजवळ गेले होते. यापैकी 250 पर्यटक हे कोलकाता, पश्चिम बंगालचे आहेत.