ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. १९ - चोला राजवटीच्या कालखंडातील जवळपास एक हजार वर्ष जुनी असलेली शिव पार्वतीची भारतातून चोरीला गेलेली मूर्ती अमेरिकेत सापडली आहे. कुख्यात स्मगलर सुभाष कपूर याने ती मूर्ती चोरल्यानंतर अमेरिकेमध्ये तस्करी करून पाठवली होती.
सुभाष कपूरने एक हजार वर्षांपेक्षा जुन्या असलेल्या काही मूर्त्या सत्य लपवून बॉल स्टेट युनिव्हर्सिटीमधील ओस्ले म्युझियमला विकल्या आहेत. पंचधातूची असलेल्या या मूर्तीसह एकूण सहा प्राचीन मूर्त्या सध्या अमेरिकेच्या कस्टमच्या ताब्यात आहे.
भारतातल्या दुर्मिळ व प्राचीन मूर्त्या अनेक देशांमध्ये तस्करी करून करोडो रुपयांची माया जमवल्याचा आरोप असलेला सुभाष कपूर सध्या पोलीसांच्या कोठडीत आहे.
अमेरिकी पोलीसांनी गेल्या तीन वर्षांमध्ये विविध म्युझियमसोबत चर्चा करून कपूरने विकलेल्या तस्करीच्या मूर्त्या हस्तगत करण्याची कारवाई जोरात हातात घेतली आहे.
सुभाष कपूरने या मूर्त्या स्वत:च्या आर्ट गॅलरीमध्ये विकायला ठेवल्या, परंतु त्या त्याने कशा मिळवल्या ही बाब उघड न करता ग्राहकांची फसवणूक केली. कपूरने चोरी केली आहे, आणि दाखवलेली सगळी कादगपत्रे बनावट आहेत याबद्दल आपल्याकडे अजोड पुरावा असल्याचा दावा अमेरिकी पोलीसांनी केला आहे.