नवी दिल्ली : पुरी येथील प्रसिद्ध जगन्नाथ मंदिराच्या मालकीची ओदिशा आणि ओदिशाच्या बाहेर ६०,४१८ एकर (२४४.५ चौरस किलोमीटर) जमीन असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या आदेशातून उघड झाले आहे. पुरी गावाच्या मालकीची १६.३३ चौरस किलोमीटर जागा असून, हे मंदिर मात्र या जागेच्या १५ पट भूभागाचे मालक आहे. मंदिराच्या मालकीच्या अनेक खाणी असल्या तरी त्यांचा परवाना ज्यांच्याकडे आहे ते देवस्थानला काहीही कायदेशीर देणे देत नाहीत, ही बाबही न्यायालयाच्या निदर्शनास आली.
न्यायालयाचे मित्र ज्येष्ठ वकील रणजित कुमार यांनी त्यांच्या अहवालात ६०,४१८ एकर जमीन जगन्नाथ मंदिराच्या मालकीची असली तरी हक्कांची दप्तरी नोंद मात्र ३०,२०१ एकर जमिनीची केली गेल्याचे नमूद केले आहे. राहिलेल्या जमिनीच्या हक्कांची नोंद सहा महिन्यांत होणे आवश्यक आहे.