नवी दिल्ली : देशातील नागरी सहकारी बँकांत जवळपास एक हजार कोटी रुपयांचे घोटाळे उघडकीस आले असून, यातील२२0 कोटी रुपयांपेक्षाही जास्त रकमेचे घोटाळे मागील पाच वर्षांतील आहेत.रिझर्व्ह बँकेने एका माहिती अधिकार अर्जावर ही माहिती दिली. त्यानुसार, २0१८-१९ या वित्त वर्षात घोटाळ्याच्या १८१ घटना उघडकीस आल्या. या घोटाळ्यांत बँकांचे १२७.७ कोटी रुपये अडकले आहेत. २0१७-१८ आणि २0१६-१७ मध्ये अनुक्रमे ९९ आणि २७ घोटाळे उघडकीस आले. यात अडकलेली रक्कम अनुक्रमे ४६.९ कोटी आणि ९.३ कोटी रुपये आहे. २0१५-१६ मध्ये १७.३ कोटी रुपयांचा समावेश असलेले १८७ घोटाळे समोर आले. २0१४-१५ मध्ये १९.८ कोटी रुपयांचा समावेश असलेले ४७८ घोटाळे समोर आले. बँकेने दिलेल्या माहितीनुसार, २0१४-१५ ते २0१८-१९ या काळात नागरी सहकारी बँकांतील घोटाळ्यांच्या एकूण ९७२ घटना उघडकीस आल्या. या घोटाळ्यांत एकूण २२१ कोटी अडकले आहेत.केंद्रीय बँकेने म्हटले की, रिझर्व्ह बँकेला कळविण्यात आलेल्या घोटाळ्यांप्रकरणी फौजदारी तक्रार दाखल करणे बँकांसाठी आवश्यक आहे. अशा घोटाळ्यांत बँक कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणेही आवश्यक आहे.याशिवाय बँकांच्या अंतर्गत प्रक्रियेनुसार दोषींना शिक्षा करणेही आवश्यक आहे.पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी (पीएमसी) बँकेतील घोटाळ्यांच्या पार्श्वभूमीवर या माहितीला महत्त्व आहे. पीएमसी बँकेवर २३ सप्टेंबरपासून रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादले आहेत.माहिती देण्यास नकारदोषींवर नेमकी काय कारवाई करण्यात आली, याची माहिती देण्यास मात्र रिझर्व्ह बँकेने नकार दिला. ही माहिती तयार स्वरूपात उपलब्ध नसते, असे बँकेने म्हटले.
नागरी सहकारी बँकांत एक हजार कोटींचे घोटाळे, २२0 कोटींपेक्षाही जास्त रक्कम अडकली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 5:22 AM