नवी दिल्ली - कर्नाटकमधील Apple Iphone बनविणाऱ्या कंपनीमध्ये मोठी तोडफोड करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. कर्नाटकच्या कोलार जिल्ह्यातील नरसापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये ही फॅक्टरी आहे. येथील कर्मचाऱ्यांना अनेक महिन्यांपासून पगार न दिल्याने त्यांनी ही तोडफोड केल्याचे समोर आले आहे. नरसापूरमध्ये तैवानची एक कंपनी विस्ट्रॉन Apple चे आयफोन बनविते. या कंपनीत कर्मचाऱ्यांनी गोंधळ घातला, तोडफोड केली. यामध्ये तब्बल 440 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती आता मिळत आहे.
विस्ट्रॉनमध्ये कर्मचाऱ्यांनी काचेचे दरवाजे आणि केबिनही फोडल्या. तसेच उभ्या असेलल्या वाहनांना आग लावली. ही तोडफोड खूप वेळ सुरु होती. याचसोबत दगडफेकही करण्यात आली. कंपनीच्या नावाच्या बोर्डालाही आग लावण्यात आली. या सर्व प्रकारात 440 कोटींचं नुकसान झालं आहे. तसेच हजारो आयफोन्सची चोरी करण्यात आल्याची माहिती आता कंपनीच्यावतीने देण्यात आली आहे. पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत कंपनीने हे म्हटलं आहे. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
कर्मचाऱ्यांचे पगार थकविले; कर्नाटकमधील 'Apple' कंपनीत तोडफोड, जाळपोळ
गेल्या काही महिन्यांपासून पगारच दिला नसल्याचा आरोप या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी केला आहे. कंपनी नेहमी पगार देण्याचे आश्वासनच देत होती, मात्र पैसे दिले नाहीत. यामुळे घरखर्च कसा चालवायचा असा प्रश्न उभा राहिला आहे. या रागात कर्मचाऱ्यांनी तोडफोड केली आहे. तसेच या दरम्यान हजारो आयफोन्सची लूट करण्यात आली आहे. यामुळे कंपनीचे मोठं प्रमाणात नुकसान झालं आहे.
कर्मचाऱ्यांचा संताप पाहून कंपनीच्या व्यवस्थापनाने पोलिसांना याची माहिती दिली होती. पोलिसांना हिंसक झालेल्या कर्मचाऱ्यांवर नियंत्रण मिळवण्यात यश आले होते. तोडफोडीचे काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये कर्मचाऱ्यांचा संताप पाहायला मिळत आहे. कंपनीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी काही लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणाचा अधिक तपासही केला जात आहेत.