जयपूर - राजस्थानच्या जयपूरमध्ये असलेल्या सांभर तलावात हजारो पक्ष्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या भागात विविध प्रजातींच्या पक्ष्यांचा अधिवास आहे. काही स्थलांतरीत पक्षीही दरवर्षी सांभार तलावात येत असतात. मात्र आता पक्षांच्या मृत्यूने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सांभर तलावात हजारो पक्षी येत असतात. मात्र अचानक पक्ष्यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी वन विभागाला तातडीने माहिती दिली. अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून तपास करत आहेत. सर्व मृत पक्षी वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. मृत्यू होण्यामागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाहीत. त्यामुळेच तपासणी करण्यात येत आहे. हिमालय, सायबेरिया, उत्तर आशियासह अन्य देशांमधून आलेल्या पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे.
जवळपास पाच ते आठ हजार पक्ष्यांचा संशयास्पद मृत्यू झालाचा दावा स्थानिक लोकांनी केला आहे. मात्र प्रशासनाने 1000 पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. नॉदर्न शावलर, पिनटेल, कॉनम टील, रूडी शेल डक, कॉमन कूट गेडवाल, रफ, ब्लैक हेडड गल, ग्रीन बी ईटर, ब्लॅक शेल्डर काइट, कॅसपियन गल, ब्लॅक विंग्ड स्टील्ट, सेंड पाइपर, मार्श सेंड पाइपर, कॉमस सेंड पाइपर, वुड सेंड पाइपर पाइड ऐबोसिट, केंटिस प्लोवर, लिटिल रिंग्स प्लोवर, लेसर सेंड प्लोवर या पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
हजारो पक्ष्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूमुळे झालेला नाही. तर सांभर तलावाच्या पाण्यात विषारी पदार्थ मिसळल्याने पक्षांचा मृत्यू झाला असावा असे प्राथमिक तपासातून समोर येत असल्याची माहिती पक्ष्यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या टीममधील एका अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक हे जयपूरमधील सांभर तलावाजवळ स्थलांतरीत पक्षी पाहण्यासाठी येत असतात. लाखो पक्षी या तलावावर येत असतात. यामध्ये जवळपास 50 हजार फ्लेमिंगो आणि 1 लाख वेडर्स असतात.