जम्मू :
भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपली प्रतिमा डागाळण्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च केले; परंतु, सत्य नेहमीच समोर येते, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी येथे म्हटले. सोशल मीडियावर आपल्याला उपहासात्मकपणे पप्पू संबोधण्यात येत असल्याबद्दल ते बोलत होते. राहुल म्हणाले की, या देशात पैसा, सत्ता आणि अहंकार नाही तर सत्याचा विजय होतो हे काँग्रेस सत्ताधारी भाजप शिकवेल, असे ते म्हणाले.
सत्य लपविता येत नाहीबीबीसीवरील एका व्हिडीओवरून चर्चा सुरू असताना राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, कोणतीही बंदी अथवा लोकांना घाबरवून सत्य समोर येण्यापासून रोखले जाणार नाही. ते म्हणाले की, जर आपण वेद, भगवद्गीता वाचली तर हे लक्षात येईल की, सत्य लपविता येत नाही. सत्य समोर येतेच.
‘भारत जोडो’त अभिनेत्री उर्मिला मातोंडकर - अभिनेत्री ते राजकारण असा प्रवास करणाऱ्या उर्मिला मातोंडकर यांनी मंगळवारी सकाळी कडाक्याच्या थंडीत जम्मूत भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला. - उर्मिला यांनी २०१९ मध्ये काँग्रेसचा राजीनामा दिला होता आणि २०२० मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता. पदयात्रेत त्या राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा करताना दिसून आल्या.
‘दिग्विजयसिंह यांच्या विधानाशी सहमत नाही’- सशस्त्र दलांना कोणतेही पुरावे दाखवण्याची गरज नाही, असे सांगून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पक्ष सर्जिकल स्ट्राइकवरील ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांच्या विधानांशी सहमत नसल्याचे मंगळवारी स्पष्ट केले. सिंह यांनी सोमवारी ‘सर्जिकल स्ट्राइक’वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सरकार खोटे बोलत असल्याचा आरोप केला होता.- ‘मी दिग्विजयसिंह यांच्या विधानाशी सहमत नाही. ते त्यांचे वैयक्तिक मत आहे. आम्ही त्यांच्याशी असहमत आहोत आणि ही काँग्रेसची अधिकृत भूमिका आहे, असे राहुल यांनी येथे पत्रकारांना सांगितले. आमचा लष्करावर पूर्ण विश्वास असून, सशस्त्र दलांना त्यांच्या कामगिरीचा कोणताही पुरावा देण्याची गरज नाही,’ असे ते म्हणाले.