कौशांबी (उप्र): पंडित जवाहरलाल नेहरुंनी कुंभमेळ्याला दिलेल्या भेदीदरम्यान हजारो लोक चेंगराचेंगरीत मारले गेले, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ते कौशांबीत एका जाहीर सभेत बोलत होते. नेहरुंनी कुंभमेळ्याला भेट दिली. त्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत हजारो नागरिकांनी प्राण गमावला. मात्र सरकारची आणि नेहरुंची नाचक्की टाळण्यासाठी त्यावेळी हे वृत्त दाबण्यात आलं, असा दावा मोदींनी केला. यंदा कुंभमेळ्यात कोट्यवधी लोक आले. पंतप्रधान स्वत: आले. मात्र कोणतीही चेंगराचेंगरी झाली नाही. कोणाचाही मृत्यू झाला नाही. सरकार बदलल्यावर व्यवस्था कशी बदलते, याचं हे उदाहरण असल्याचं मोदी म्हणाले. 'नेहरु कुंभमेळ्याला भेट देण्यासाठी आले होते, त्यावेळी तर फारशी गर्दीदेखील नव्हती. केंद्र आणि राज्यात काँग्रेसचं सरकार होतं. मात्र तरीही चेंगराचेंगरीचं वृत्त दाबण्यात आलं. मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना एक रुपयादेखील दिला गेला नाही. केवळ चेंगराचेंगरीच नव्हे, तर त्यानंतरदेखील जे घडलं ते अतिशय असंवेदनशील होतं. अन्यायकारक होतं,' असं मोदी म्हणाले. मी अनेकदा कुंभमेळ्याला भेट दिली आहे, असं मोदींनी सांगितलं. 'जेव्हा सरकार बदलतं, तेव्हा नियत बदलते आणि त्यानंतर परिणाम दिसू लागतात. प्रयागराजनं यंदा हे अनुभवलं. आधी या ठिकाणी कुंभमेळा व्हायचा, तेव्हा आखाड्यावरुन वाद व्हायचे. भ्रष्टाचार झाल्याची चर्चा व्हायची. मात्र यंदाच्या कुंभमेळ्यानं सर्वांची मान अभिमानानं उंचावली. एकही आरोप झाला नाही. ज्यांनी या मेळ्यात स्वच्छतेची जबाबदारी पार पाडली, त्यांच्याबद्दल तर माझ्या मनात अतिशय आदराची भावना आहे. त्यांनी कुंभमेळ्याबद्दल लोकांच्या मनात असलेली प्रतिमा बदलली,' असं मोदींनी म्हटलं.
नेहरुंच्या काळात कुंभमेळ्यात हजारो लोक मारले गेले- मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2019 11:18 AM