कोलकाता : भारतीय उपखंड अब्जावधी वर्षांपूर्वी अंटार्टिकाचा भाग होता या गृहीतकाला बळ देणारे पुरावे शास्त्रज्ञांना सापडले आहेत. हे दोन्ही भूभाग मिळून एकच विशाल खंड होता. मात्र, मानव उत्पत्तीपूर्वी प्रस्तरांच्या उलथापालथीमुळे ते एकमेकांपासून वेगळे व पुन्हा एकजीव होण्याची क्रिया अनेकदा घडल्याचे मानले जाते. भारत व स्वीत्झर्लंडचे भूवैज्ञानिक पृथ्वीचे कवच कसे विकसित झाले यावर संशोधन करीत आहेत. त्यांनी भारतीय उपखंडाच्या पूर्व घाटातील प्राचीन दगडांचा अभ्यास केला. त्यातून त्यांना या उपखंडाच्या निर्मितीचे महत्त्वपूर्ण धागेदोरे हाती लागले. अंटार्टिका खंड व भारतीय उपखंड मिळून कधीकाळी एकच विशाल खंड होता. दीड अब्ज वर्षांपूर्वी त्याचे विभाजन झाल्याचे गृहीतक असून, ते सिद्ध करणे आम्हाला पहिल्यांदाच शक्य झाले आहे, असे आयआयटी खरगपूरचे भूवैज्ञानिक देवाशिष उपाध्याय यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. (वृत्तसंस्था)>अशी झाली पृथ्वीवरील उलथापालथभारत आणि अंटार्टिका एकच होते. त्यांना समुद्राने वेगवेगळे केले. पुढे विशाल भूभागाच्या हालचालींमुळे समुद्र बंद होऊन ते पुन्हा संपर्कात आले. एक अब्ज वर्षांपूर्वी ते एकमेकांवर आदळून पुन्हा वेगळे झाले. याच उलथापालथीतून पूर्व घाटातील पर्वतराजी तयार झाली आहे. वेगळे झाल्यानंतर या दोन खंडांत आधी ज्या ठिकाणी जुना समुद्र होता तेथेच पुन्हा नवा समुद्र तयार झाला. हे संशोधन एल्सवायर या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. वेगळे झालेल्या या खंडांची ६०० दशलक्ष वर्षांपूर्वी पुन्हा धडक होऊन पूर्व घाटांत पर्वतांची आणखी एक शृंखला निर्माण झाली.या पर्वतराजीचा काही भाग पूर्व घाटांत व काही मॅडागास्करमध्ये आहे. मॅडागास्कर एकेकाळी भारतीय उपखंडाचा एक भाग होता, असे स्वीत्झर्लंडच्या बर्न विद्यापीठातील भूविज्ञान विभागाचे प्रोफेसर क्लॉस मेझगर यांनी सांगितले. शेवटच्या धडकेनंतर भारत- अंटार्टिका पुन्हा वेगळे झाले आणि आता त्यांच्यात महासागर आहे. पृथ्वीच्या इतिहासात हे दोन्ही खंड अनेकदा एकजीव आणि वेगळे झाल्याचे संशोधन अहवालात म्हटले आहे.
अब्जावधी वर्षांपूर्वी भारत होता अंटार्टिकाचा भाग
By admin | Published: August 05, 2016 4:28 AM