ऑनलाइन लोकमत
लाहोर, दि. 14 - भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांचा खटला जो कोणी वकील लढेल त्याच्याविरोधात कारवाई केली जाईल असं लाहोर उच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनने म्हटलं आहे. लाहोर उच्च न्यायालय बार असोसिएशनचे सचिव जनरल आमेर सईद रान यांनी शुक्रवारी एका बैठकीनंतर ही माहिती दिली. बार असोसिएशनने पाकिस्तान सरकारला कोणत्याही परदेशी ताकदीसमोर न झुकण्याचं आवाहन केलं आहे.
""जाधव हे भारतीय नागरिक असल्याचं भारताने मान्य केलं असून त्यांना सोडवण्यासाठी पाकिस्तानवर दबाव आणण्याचा प्रय़त्न करत आहे. पाकिस्तानी नागरिकांच्या जीवाशी खेळणा-या गुप्तहेराला वाचवलं जाऊ नये, सरकारने त्याला फाशी द्यावी"" अशी मागणी सईद यांनी केली.
दरम्यान, इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्त गौतम बंबावले पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव तहमीना जनजुआ यांच्यासोबत जाधव प्रकरणावर भेट घेणार असल्याचं वृत्त आहे. या प्रकरणी गेल्या वर्षी पाकिस्तानने भारताकडून करण्यात आलेल्या 13 अपील फेटाळल्या होत्या.
अशाप्रकारे भारताला टाळता येईल कुलभूषण जाधवांची फाशी-
पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने सोमवारी कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली. त्यानंतर भारताकडून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. जाधव यांना फाशी झाल्यास तो हत्येचा पूर्वनियोजित कट ठरेल अशा शब्दात भारताने पाकिस्तानला ठणकावले आहे. भारताचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी पाकिस्तानी उच्चायुक्त अब्दुल बासित यांना बोलावून विरोधाचे पत्र देऊन चांगलेच खडसावले. या पत्रात भारताने कुलभूषण जाधव यांना शिक्षा सुनावली जाताना अनेक कायदेशीर हक्कांची पायमल्ली केल्याचं म्हटलं आहे.
काय आहेत पर्याय-
-कुलभूषण यांना कायदेशीर मदत न दिल्याचा आरोप भारताने केला आहे. त्यामुळे योग्य ती कायदेशीर मदत मिळाल्यास फाशीच्या शिक्षेविरोधात पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतो.
-ज्याप्रकारे पाकिस्तानने वर्षभराच्या आत खटला चालवत तडकाफडकी फाशीची शिक्षा सुनावली त्यामुळे जाधव यांच्या अनेक कायदेशीर हक्कांची पायमल्ली झाली. हा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्थरावर योग्यप्रकारे मांडून आणि संयुक्त राष्ट्रात हा मुद्दा उचलून धरल्यास पाकिस्तानवर दबाव निर्माण होऊ शकतो.
-कूटनीतीचा वापर करून पाकिस्तानवर दबाव वाढवण्याचा भारताकडे पर्याय आहे. पाकिस्तानच्या वर्मावर बोट ठेवून कुलभूषण यांना न्याय मिळण्याची अपेक्षा भारत ठेवू शकतो.
- याशिवाय सर्वात महत्वाचा पर्याय म्हणजे दोन्ही देशांच्या प्रमुखांनी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी या प्रकरणी हस्तक्षेप करून चर्चा करावी, या मुद्यावरून दोन्ही देशांतील संबंध आणखी ताणले जाऊ नयेत यासाठी जाधव यांची फाशी रद्द करण्याचा निर्णय होऊ शकतो.