श्रीनगर: काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ तब्बल 450 दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. गुप्तचर विभागानं याबद्दलचा अहवाल केंद्र सरकारला पाठवला आहे. दहशतवाद्यांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये 11 लॉन्चिंग पॅड्स तयार केले असून त्यांच्याकडून अमरनाथ यात्रेला लक्ष्य केलं जाऊ शकतं, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांकडून केंद्र सरकारला देण्यात आली आहे. गुप्तचर यंत्रणांनी केंद्राला दिलेल्या अहवालात सीमेपलीकडील दहशतवाद्यांच्या वाढत्या हालचालींचा उल्लेख आहे. 'पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना असलेल्या हिजबुल मुजाहिद्दीन आणि लष्कर-ए-तोयबा यांच्याकडून अमरनाथ यात्रेवर हल्ला करण्याची तयारी सुरू आहे,' असं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. 28 जूनपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात होणार आहे. 'केंद्र सरकारनं रमझानच्या पवित्र महिन्यात दहशतवाद्यांविरुद्धची कारवाई थांबवली. यामुळे दहशतवादी संघटनांना नव्या दहशतवाद्यांची भरती करण्यासाठी, शस्त्रास्त्रांची जुळवाजुळव करण्यासाठी बराच कालावधी मिळाला,' असं गुप्तचर यंत्रणांनी अहवालात म्हटलं आहे. 'आज तक'नं सूत्रांच्या हवाल्यानं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. लष्करानं नियंत्रण रेषा ओलांडून सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर प्रथमच दहशतवाद्यांची मोठी हालचाल पाकव्याप्त काश्मीरकडे पाहायला मिळते आहे. भारतीय लष्करानं सर्जिकल स्ट्राईकवेळी पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे लॉन्चिंग पॅड्स उद्ध्वस्त केले होते. मात्र आता दहशतवाद्यांविरुद्धची कारवाई थांबवण्यात आल्यानं लॉन्चिंग पॅड्स उभारण्यासाठी दहशतवाद्यांना पुरेसा कालावधी मिळाला आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हालचाली वाढल्याच्या वृत्ताला गृह मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानंही दुजोरा दिला आहे.
अमरनाथ यात्रेला धोका? तब्बल 450 दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2018 6:39 PM