नवी दिल्ली : इंडिगो या खाजगी विमानसेवा कंपनीचीअकरा विमाने स्फोटाने उडवून दिले जाऊ शकतात, असा धोकादायक इशारा देणारा फोन अमेरिकेतून आल्यानंतर एकच घबराट पसरली असून राजधानी दिल्लीसह देशभरातील अनेक विमानतळावर सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलण्यात आली आहे. हा धोकादायक इशारा फोनवरून देणाऱ्या व्यक्तीचे नाव स्मिथ (अमेरिकन) आहे. इंडिगोची ही अकरा विमाने उड्डाणाच्या तयारीत होती किंवा दहा विमानतळावरून निघाली होती. यापैकी एका विमानातील एक महिला बॉम्बस्फोट करू शकते, असा इशारा देणारा फोन चेन्नईतील इंडिगोच्या कॉल सेंटरमध्ये आल्यानंतर तातडीने ही सर्व अकरा विमाने रोखण्यात आली.दिल्ली, मुंबई, कोलकाता, अहमदाबाद, चेन्नई, श्रीनगर, वडोदरा, गुवाहटी, गोवा आणि कोच्ची या विमानतळारून उड्डाण करणाऱ्या विमानांना हा धोका होता. पाकिस्तानच्या ‘आयएसआय’शी संबंधित एका प्रवासी महिलेजवळ बॉम्ब असून ती यापैकी एखादे विमान बॉम्ब स्फोटाने उडवून देऊ शकते, असेही स्मिथ याने कळविले. चेन्नईतील इंडिगोच्या कॉल सेंटरमध्ये बुधवारी साधरणत: सव्वाअकरा वाजेच्या सुमारास हा फोन आला. त्यानंतर क्षणाचाही उशीर न करता सुरक्षा संस्थांना याची माहिती देण्यात आली. सर्व प्रवाशी सुरक्षित आहेत, असे इंडिगोने स्पष्ट केले. सुरक्षा संस्था या सर्व विमानांची कसून तपासणी करीत आहेत.हा फोन आल्यानंतर सर्व विमानतळांवरील बॉम्ब धमकी आकलन समित्या शिताफीने कामाला लागल्या. ज्या विमानांना धोका होण्याची शक्यता आहे, ती विमाने तपासण्यासाठी वेगळ्या ठिकाणी नेण्यात आली.विमानसेवा कंपन्या, विमानतळ आणि अन्य सरकारी संस्थांसाठी निर्दिष्ट करण्यात आलेल्या सर्व कार्यपद्धतीचा अवलंब केला जात असून अतिरिक्त सुरक्षात्मक उपाययोजनाही केल्या जात आहेत, असेही इंडिगोने सांगितले.