नवी दिल्ली : देशात आणीबाणी लादण्यावरून काँग्रेसवर लोकशाही व राज्यघटनेच्या गळचेपीचे आरोप करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या सध्याच्या राजवटीतीतच घटनात्मक लोकशाही संस्थांना पद्धतशीरपणे सुरुंग लावला जात आहे, असे खरमरीत प्रत्युत्तर काँग्रेसने मंगळवारी दिले.आणीबाणीच्या ४३व्या वर्षदिनानिमित्त केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी फेसबुकवर तीन भागांमध्ये ब्लॉग लिहून काँग्रेसवर टीका केली व पंतप्रधान इंदिरा गांधी यांची तुलना हिटलरशी केली. तेच सूत्र पकडून पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी मुंबईतील कार्यक्रमात एका कुटुंबाची (गांधी-नेहरू) सत्ता अबाधित ठेवण्यासाठी काँग्रेसने राज्यघटना गुंडाळून ठेवून आणीबाणीत संपूर्ण देशाला तुरुंग करून टाकले, असा आरोप केला.काँग्रेस प्रवक्ते आनंद शर्मा यांनी टिष्ट्वटरवर जेटली व मोदींच्या या टीकेचा खरपूस समाचार घेतला. मोदींच्या वक्तव्याचा संदर्भ न देता शर्मा यांनी लिहिले की, भारतात सध्या एकाधिकारशाही पंतप्रधान व उद्दाम सरकारच्या देखरेखीखाली सर्व घटनात्मक संस्थांना सुरुंग लावून सत्तेचे केंद्रीकरण सुरू आहे.जेटलींनी इंदिरा गांधींशी केलेली तुलना ‘हास्यास्पद, अपमानकारक व इतिहासाचा विपर्यास करणारी’ आहे, असे नमूद करून त्यांनी लिहिले की, इंदिराजी त्यांच्या काळातील उत्तुंग नेत्या व लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या पंतप्रधान होत्या. इंदिराजींचे लोकनियुक्त सरकार असंवैधानिक व लोकशाहीविरोधी पद्धतीने उलथून टाकण्याचे प्रयत्न झाल्याने आणीबाणी जाहीर केली. आणीबाणी लादणे गैर होते, हे मान्य करून इंदिराजींनी नंतर खेदही व्यक्त केला होता.जेटलींना ‘सोईस्कर स्मृतिभ्रंश’ झाल्याचे दिसते, असा टोमणा मारत शर्मा यांनी म्हटले की, हुकूमशहा कधी निवडणुका घेत नसतात, परंतु इंदिराजींनी आणीबाणी उठवून निवडणूक घेतली व पराभव विनम्रतेने स्वीकारला, याची आठवण भाजपाला करून देण्याची गरज आहे. जनतेने पुन्हा १९८०च्या निवडणुकीत इंदिराजींना भरघोस बहुमताने निवडून दिले व त्यांच्यामागे हात धुऊन लागलेल्यांना इतिहासाच्या कचराकुंडीत फेकून वादावर निर्णायक फैसला दिला होता.
नरेंद्र मोदी व उद्दाम सरकारमुळे राज्यघटना धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 5:39 AM