ऑलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १८ - राजधानी दिल्लीतील सर्वोच्च न्यायालय बाँबने उडवण्यात येणार असल्याची धमकी एका अज्ञात व्यक्तीने ईमेलद्वारे दिली असून यामुळे मोठी खळबळ माजली आहे. या धमकीच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात ही धमकी मिळाली असून न्यायालयाची इमारत बाँबने उडवून देऊ असे त्यात म्हटले आहे. पोलिस या मेलची सत्यता पडताळून पाहत असून मेल कोणी पाठवली याचाही तपास सुरू आहे. दरम्यान या मेलच्या पार्श्वभूमीवर सर्व लॉ इंटर्न्सना एक महिन्यासाठी कोर्टात येण्यास मनाई करण्यात आली असून कोर्टाच्या आवारात येणा-या प्रत्येक व्यक्तीची कसून तपासणी करण्यात येत आहे.
१९९३ सालच्या बाँबस्फोट खटल्यातील दोषी याकूब मेमनला गेल्या महिन्यात (३० जुलै) फासावर चढवण्यात आल्यानंतर त्याची पुनर्विचार याचिका फेटाळत त्याच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करणारे न्या. दीपक मिश्रा यांनाही धमकीचे पत्र पाठवण्यात आले होते. त्यानंतर दीपक मिश्रांसह याकूबच्या फाशीवर शिक्कामोर्तब करणा-या इतर न्यायाधीशांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. तसेच भारताला याकूबच्या फाशीचे परिणाम भोगावे लागतील अशी धमकी कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार छोटा शकीलनेही दिली होती. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर देशातील सुक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.