नवी दिल्ली : सीबीआयचे माजी विशेष महासंचालक राकेश अस्थाना हे मला दुबईत भेटले होते. आम्ही सांगू तसे न केल्यास तुरुंगात तुझे जीवन नरक बनविले जाईल, अशी धमकीही अस्थाना यांनी दिली होती, असा खळबळजनक गौप्यस्फोट आगुस्ता वेस्टलॅण्ड घोटाळ्यातील आरोपी ख्रिस्तियन मिशेल याने भर कोर्टात केला. तिहार तुरुंगात अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) मिशेलची बुधवारी किंवा गुरुवारी चौकशी करण्याची मुभा विशेष न्यायाधीश अरविंद कुमार यांनी दिली. त्यांच्या समक्ष मिशेल उपरोक्त गौप्यस्फोट केला. राकेश अस्थाना मला दुबईत भेटले असता त्यांनी मला उपरोक्त धमकी दिली. आज तसेच घडतेय. तुरुंगात माझ्या शेजारच्या कोठडीत छोटा राजन आहे. मला दहशतवादी आणि अनेक लोकांना ठार मारणाऱ्या गुन्हेगारांसोबत डांबले जात आहे. असा मी कोणता गुन्हा केला, हेच मला ठाऊक नाही. मला तुरुंगात १६ ते १७ काश्मिरी दहशतवाद्यांसोबत डांबले; परंतु तुरुंग प्रशासनाने माझ्या जिवाला असलेल्या धोक्याचा विचार करून मला सुरक्षित कोठडीत हलविण्यात आले, असे मिशेलने कोर्टात सांगितले. तुरुंगात मिशेलची सकाळी आणि सायंकाळी अर्धा तास चौकशी करतेवेळी तुरुंग अधिकारी हजर असतील, तसेच मिशेलच्या वकिलालाही काही मर्यादित वेळेसाठी सोबत राहता येईल, असे कोर्टाने सांगितले.तुरुंगात मानसिक छळ होत असल्याचा आरोपतुरुंगात मानसिक छळ होत असल्याचा आरोपही मिशेल याने केला. त्याची दखल घेऊन कोर्टाने ज्या आधारावर त्याला सुरक्षित कोठडीत हलविण्यात आले, त्यासंबंधीचे सीसीटीटीव्ही फुटेज आणि अहवाल गुरुवारपर्यंत सादर करण्याचे तुरुंग प्रशासनाला निर्देश दिले. दुबईतून प्रत्यार्पण केल्यानंतर ईडीने मागच्या वर्षी २२ डिसेंबर रोजी मिशेलला अटक केली होती.
'तुरुंगात माझे जीवन नरक बनविण्याची धमकी'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 6:43 AM