नितीन अग्रवालनवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका अद्याप पुरता टळलेला नाही. नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी असले तरी सण, उत्सव आणि लग्नसराईमुळे पुढील तीन महिने अत्यंत सावधगिरी बाळगणे जरूरी आहे, असे आवाहन सरकारने लोकांना केले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, ६२ जिल्ह्यांत नवीन रुग्ण आढळण्याचा दर ५ टक्क्यांच्या अधिक धोकादायक पातळीपेक्षाही जास्त आहे. देशभरातील एकूण रुग्णसंख्या सध्या २.४४ लाख आहे. यापैकी महाराष्ट्रात ३६,७६७ आणि केरळमध्ये १.२२ लाख रुग्ण आहेत. आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, देशातील एकूण रुग्णांपैकी केरळमध्ये ५०.७३ टक्के आणि महाराष्ट्रात १५.०६ टक्के रुग्ण आहेत. याशिवाय मिझोराममध्ये १६,६३७, कर्नाटकात ११,८४८ रुग्ण आहेत.
मिझोराममध्ये नवीन रुग्ण आढळण्याचा दर सर्वाधिक २१.६४ टक्के आहे. केरळमध्ये १३.७२ टक्के आणि सिक्कीममध्ये १२.७६ टक्के लोकांना कोरोना विषाणूंचा संसर्ग झाल्याचे आढळले आहे. या ठिकाणी धोका अजूनही कायम आहे. निष्काळजीपणा केल्यास रुग्णवाढीचा दर धोकादायक पातळी गाठू शकतो. ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरदरम्यान नवरात्र, दसरा, दुर्गापूजा, दिवाळी, ईद आणि नाताळ, तसेच नवीन वर्ष यासारखे सण, उत्सव साजरे होत नसल्याने हे तीन महिने अत्यंत सावधगिरी बाळगणे जरूरी आहे. आगामी सण, उत्सव लोकांनी घरीच राहून ऑनलाइन साजरे करावेत, असा सल्लाही अग्रवाल यांनी दिला आहे.
निति आयोगाने सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही.के. पॉल यांनी अमेरिका आणि ब्रिटनचे उदाहरण देत सांगितले की, धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे सावधगिरी बाळगण्यासह लसीचे दोन्ही डोस घेणे जरूरी आहे. झायडसच्या विनाइंजेक्शनची लस देण्याचे प्रशिक्षण दिले जात असून, ही लस लवकरच देण्यास सुरुवात होईल. रशियातील स्थिती वाईट असल्याने स्पुटनिक लसीचे डोस कमी प्रमाणात मिळत आहेत. कोरोनाचा विषाणूच्या नवीन स्वरूपाबाबत त्यांनी सांगितले की, यावर सातत्याने लक्ष दिले जात आहे. विषाणूचे नवे रूप शोधण्यासाठी ७० हजार नमुन्यांची तपासणी करण्याची क्षमता विकसित करण्यात आली आहे.
३४ जिल्ह्यांत रुग्णांचा दर १० टक्के६२ जिल्ह्यांत नवीन रुग्ण आढळण्याचा दर ५ टक्क्यांहून अधिक आहे. यात अरुणाचल प्रदेशातील ७ आणि आसाममधील ५ जिल्ह्यांसह २८ जिल्ह्यांत हा दर ५ ते १० टक्क्यांदरम्यान आहे. केरळच्या १३, मिझोरामच्या ७ जिल्ह्यांसह ३४ जिल्ह्यांत हा दर १० टक्क्यांहून जास्त आहे. ९२.७७ कोटी लोकांना देशभरात लस देण्यात आली असून, यापैकी ६७.०२ कोटी लोकांना एक डोस आणि २५.७५ कोटी लोकांना दोन डोस देण्यात आले आहेत. देशभरात ७१ टक्के प्रौढांना एक डोस आणि २७ टक्के प्रौढांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत.