कोलकाता, दि. 21 - नेहमीच भाजपा आणि संघविरोधी भूमिका घेणाऱ्या लालूप्रसाद यादव यांनी बिहारमधील सत्ता गेल्यानंतर आपला मोदीविरोध अधिकच तीव्र केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी 27 ऑगस्टला विरोधी पक्षांची एकजुटता रॅली आयोजित केली आहे. मात्र ही रॅली आयोजित होण्यापूर्वीच मोदीविरोधी पक्षांमध्ये फूट पडल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. बीजेपी हटाव देश बचाव असा नारा देत आयोजित होणाऱ्या या रॅलीपासून डावे पक्ष आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी दूर राहण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यामुळे भ्रष्टाराचे आरोप असलेल्या नेत्यांसोब एकाच मंचावर येण्याची डावे नेते आणि ममता बॅनर्जी यांची इच्छा नाही. त्यामुळे ही मंडळी लालूप्रसाद यादव यांच्या या रॅलीपासून दूर राहण्याची शक्यता आहे. दरम्यान बसपाच्या नेत्या मायावती यासुद्धा या रॅलीपासून दूर राहण्याची चिन्हे आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांसोबत मंचावर येणे डाव्या पक्षांना अडचणीचे वाटत आहे. त्यामुळे हे पक्ष या रॅलीत सहभागी होण्याबाबत साशंकता आहे. मात्र गेल्या गुरुवारी शरद यादव यांमी संसद भवनात आयोजित केलेल्या विरोधी पक्षांच्या रॅलीत डावे पक्ष उपस्थित होते. पण डावे पक्ष नसले तरी अनेक प्रादेशिक पक्ष आणि काँग्रेसने या रॅलीत सहभागी होण्याचे संकेत दिले आहेत. या रॅलीत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी सहभागी होणार असल्याचे राष्ट्रीय जनता दलाच्या एका नेत्याने सांगितले. अधिक वाचा लालू प्रसाद यादव यांच्या रॅलीत सहभागी झाले तर शरद यादवांवर कारवाई करणार - जेडीयूलालू प्रसाद यादव गोत्यात! सीबीआयने दाखल केला गुन्हाVIDEO : ...अन् थोडक्यात बचावले लालू प्रसाद यादव दरम्यान 27 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी आयोजित केलेल्या रॅलीत शरद यादव सहभागी होण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास तुमच्यावर कारवाई करण्यात येईल असा अप्रत्यक्ष इशाराच जेडीयूकडून देण्यात आला आहे. जेडीयूचे सरचिटणीस के सी त्यागी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे की, 'शरद यादव यांचं पक्षाशी असलेलं जुनं नातं आणि वरिष्ठ नेते असल्याने पक्षविरोधी गोष्टी करुनही त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही. मात्र 27 ऑगस्ट रोजी होणा-या लालू प्रसाद यादव यांच्या रॅलीत शरद यादव उपस्थित राहिले, तर ते लक्ष्मणरेषा पार करतील'. के सी त्यागी यांनी एकाप्रकारे कारवाई करण्याचा इशाराच दिला आहे. शरद यादव यांनी स्वत:हून पक्षा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ना शारिरीक, ना भावनिक कोणत्याही प्रकारे ते आमच्यासोबत नाहीत असंही त्यागी बोलले आहेत. आपले समर्थक आणि आरजेडी सदस्यांसोबत बैठक घेऊन शरद यादव यांनी पक्षविरोधी कारवाया केल्या असल्याचा आरोप त्यागी यांनी यावेळी केला. 'शरद यादव यांनी नेहमीच नितीश कुमार यांच्याविरोधात भूमिका घेतली. मग ती नोटाबंदी असो, सर्जिंकल स्ट्राईक असो किंवा महिला आरक्षण. दरवेळी त्यांनी नितीश कुमारांविरोधात भूमिका घेतली, आणि अंतिम टोक गाठलं', असंही त्यागी यांनी सांगितलं.
मोदीविरोधकांची एकता धोक्यात? लालूप्रसाद यादव यांच्या रॅलीपासून डावे राहणार दूर?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2017 8:59 PM