लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : अण्णा द्रमुक पक्षाचे गोठविलेले निवडणूक चिन्ह खुले करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून त्या पक्षाचे नेते टीटीव्ही दिनकरन यांच्यासोबत अटक केलेले त्यांचे हस्तक सुकेश चंद्रशेखर यांना जामीन देण्यासाठी एका तोतयाने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या नावे विशेष न्यायालयाच्या न्यायाधीशांना धमकीचा फोन केल्याचे उघड झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.विशेष सीबीआय न्यायालयाच्या न्यायाधीश पूनम चौधरी यांच्यापुढे सुकेश चंद्रशेखर याच्या जामीन अर्जावर २८ एप्रिल रोजी सुनावणी व्हायची होती. त्याच्या तासभर आधी न्यायाधीश चौधरी यांना हा धमकीचा फोन आला होता. सूत्रांनी सांगितले की, २८ एप्रिल रोजी दु. १ च्या सुमारास विशेष न्यायाधीश पूनम चौधरी त्यांच्या चेंबरमध्ये बसलेल्या असताना त्यांना लॅण्डलाइनवर एक फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण सर्वोच्च न्यायालयातील एका न्यायाधीशाचा स्वीय सचिव असल्याचे सांगितले व न्यायमूर्तींना तुमच्याशी बोलायचे आहे, असे सांगितले. त्यानंतर या तोतयाने न्यायाधीश चौधरी यांना सुकेशच्या प्रकरणाचा संदर्भ दिला व सुकेशला लगेच जामीन मंजूर केला नाही तर करियरमध्ये अडचणी येतील, अशी धमकी दिली.तोतयाने न्यायाधीश चौैधरी यांना एक मोबाईल नंबरही दिला व तो सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे स्वीय सचिव हनुमंत प्रसाद यांचा असल्याचे सांगून नंतर लागेल तेव्हा या नंबरवर फोन करा, असेही सांगितले. चौधरी यांनी या फोन करणाऱ्यास स्पष्ट नकार देऊन फोन बंद केला. नंतर न्यायालयात सुकेशच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली व न्यायाधीश चौधरी यांनी जामीन नाकारून त्याची १२ मेपर्यंत कोठडीत रवानगी केली. सूत्रांनुसार न्यायालयातून परत चेंबरमध्ये आल्यावर न्यायाधीश चौैधरी यांनी आपला मोबाईल पाहिला तर त्यावर आधी त्या फोन करणाऱ्याने जो मोबाईल नंबर दिला होता त्या नंबरवरून अनेक मिस कॉल आल्याचे त्यांना दिसले.
सुप्रीम कोर्ट जजच्या नावाने धमकीचा फोन
By admin | Published: May 09, 2017 12:42 AM