पहलू खान हत्या प्रकरणात आरोपी सुटणे धक्कादायक - प्रियांका गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 04:11 AM2019-08-17T04:11:59+5:302019-08-17T04:13:03+5:30
पहलू खान हत्या प्रकरणातील सर्व सहाही आरोपी खालच्या न्यायालयात निर्दोष सुटल्याबद्दल काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी मला धक्का बसल्याचे शुक्रवारी म्हटले.
नवी दिल्ली : पहलू खान हत्या प्रकरणातील सर्व सहाही आरोपी खालच्या न्यायालयात निर्दोष सुटल्याबद्दल काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी मला धक्का बसल्याचे शुक्रवारी म्हटले. त्यांनी राजस्थानमध्ये जमावाकडून होणाऱ्या हत्यांविरोधात बनवण्यात आलेला कायदा हा न्याय देण्यात सक्षम ठरेल, अशी आशा व्यक्त केली.
‘पहलू खान मॉब लिंचिंग प्रकरणात खालच्या न्यायालयाने दिलेला निर्णय हा धक्कादायक आहे. आमच्या देशात मनुष्य हीनतेला आणि जमावाकडून ठार मारले (मॉब लिंचिंग) जाण्याच्या घृणास्पद कृत्यांना कोणतेही स्थान असायला नको,’ असे गांधी यांनी हिंदी भाषेत केलेल्या टष्ट्वीटमध्ये म्हटले.
२०१७ मध्ये पहलू खान यांची जमावाकडून झालेल्या मारहाणीत हत्या झाली होती. अलवार न्यायालयाने १४ आॅगस्ट रोजी सर्व सहाही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
पहलू खान (५५), त्यांची दोन मुले व इतर काही जण १ एप्रिल २०१७ रोजी जयपूरहून गायी घेऊन निघाले असताना राजस्थानच्या अलवार जिल्ह्यात जमावाने त्यांना अडवून मारहाण केली होती. त्यात पहलू खान यांचा मृत्यू झाला होता. जमावाकडून झालेल्या मारहाणीत व्यक्तीचा मृत्यू झाल्यास दोषींना जन्मठेपेची शिक्षा आणि पाच लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठावणारे विधेयक राजस्थान विधानसभेने पाच आॅगस्ट रोजी संमत केले आहे.