शनिवारी काही तासांमध्ये भारती हवाई दलाची तीन विमाने दुर्घटनाग्रस्त झाल्याने खळबळ उडाली आहे. हवाई दलाचे एक लढाऊ विमान राजस्थानमध्ये तर दोन विमाने मध्य प्रदेशमध्ये दुर्घटनाग्रस्त झाली. अवघ्या काही तासांमध्ये तीन विमानांचा अपघात झाल्याने खळबळ उडाली आहे.
मध्य प्रदेशमधील मुरैना येथे शनिवारी सकाळी मोठा अपघात झाला आहे. त्यामध्ये हवाई दलाची दोन लढाऊ विमाने सुखोई-३० आणि मिराज २००० अपघातग्रस्त झाली. माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पुढील कारवाई सुरू करण्यात आली. सुरक्षा यंत्रणांमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही विमानांनी ग्वाल्हेर येथील हवाई तळावरून उड्डाण केले होते. तिथे नियमित सराव सुरू होता. दरम्यान, संरक्षण मंत्र्यांनी या अपघाताबाबत हवाई दल प्रमुखांशी चर्चा केली आहे.
मुरैनाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितले की, जेट विमाव सकाळी साडे पाचच्या सुमारास दुर्घटनाग्रस्त झाले. दोन्ही पायलट सुखरूपपणे बाहेर आले. अपघातानंतर कोर्ट ऑफ इन्क्वायरी बसवण्यात आली आहे. त्यामधून दोन्ही विमनांचा एकमेकाशी टक्कर होऊन अपघात झाला की, कुठल्या अन्य कारणामुळे अपघात झाला, याचा शोध घेण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुखोई ३० विमानामध्ये दोन पायलट होते. तर मिराज २००० विमानामध्ये एक पायलट होता. दोन पायलट सुरक्षित आहेत. तर एक हेलिकॉप्टर तिसऱ्या पायलटच्या लोकेशनवर पोहोचले आहे.
दरम्यान, राजस्थानमधील भरतपूर येथेही लष्कराचे एक विमान अपघातग्रस्त झाले आहे. भरतपूरमधील सेवर ठाणा परिसरात हे विमान अपघातग्रस्त झाले. अपघातानंतर विमानाचे तुकडे झाले आणि मोठ्या आवाजासह त्याला आग लागली. सुदैवाने हे विमान मोकळ्या जागेवर कोसळले. मात्र त्यात किती प्रवासी होते, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.