आग्रा: उत्तर प्रदेशातील सुभाष पार्कमधील अग्रवाल सीटी स्कॅन सेंटरमध्ये एका तीन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. सीटी स्कॅन सुरू असताना दिव्यांशनं अखेरचा श्वास घेतला. दिव्यांश छतावरून खाली पडल्यानं त्याला इजा झाली होती. त्यामुळे कुटुंबीय त्याला सीटी स्कॅनसाठी घेऊन गेले होते. दिव्यांश हसत हसत सीटी स्कॅनमध्ये गेला होता. मात्र ज्यावेळी त्याला बाहेर काढण्यात आलं, त्यावेळी त्याचा श्वास थांबला होता.
घटनेची माहिती मिळताच दिव्यांशच्या नातेवाईकांनी सीटी स्कॅन सेंटरमध्ये धाव घेतली. त्यामुळे गोंधळ झाला. नातेवाईकांना पाहून डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी सेंटर बंद करून पळ काढला. काही वेळात पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. डॉक्टरांनी चुकीचं इंजेक्शन दिल्यानं दिव्यांशचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. या प्रकरणी पोलिसांनी डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
धनौलीत वास्तव्यास असलेल्या विनोद कुमार यांचा मुलगा दिव्यांश छतावरून पडला. त्याला दुखापत झाली. त्यामुळे शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजता त्याला नामनेर येथील एस आर रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी संध्याकाळी त्याला सीटी स्कॅनसाठी पाठवलं. त्यानंतर कुटुंबीय त्याला सुभाष पार्क परिसरातील डॉ. नीरज अग्रवाल यांच्या सेंटरवर घेऊन गेले. तिथे दिव्यांशला इंजेक्शन देण्यात आलं. त्यानंतर त्याची प्रकृती बिघडली.
सीटी स्कॅन सेंटरच्या कर्मचाऱ्यांनी दिव्यांशला त्याच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केलं. ते मुलाला घेऊन रुग्णालयात पोहोचले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. त्यानंतर कुटुंबीय त्याला पुन्हा सीटी स्कॅन करणाऱ्या डॉक्टरांकडे घेऊन गेले. पण सेंटरला कुलूप होतं. याची माहिती कुटुंबीयांनी नातेवाईकांना दिली. थोड्याच वेळात कुटुंबीय सेंटरजवळ जमले. पोलीसदेखील घटनास्थळी पोहोचले. या प्रकरणी पोलिसांनी डॉक्टर अग्रवाल आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.