नवी दिल्ली - लडाखमध्ये सीमाप्रश्नावरून भारत आणि चीनमध्ये असलेला तणाव दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. दरम्यान, आज चिनी सैनिकांशी झालेल्या झटापटीमध्ये भारताच्या एका लष्करी अधिकाऱ्यासह अन्य दोन जवानांना वीरमरण आले आहे. चिनी सैन्याने विश्वासघात करून केलेल्या हल्ल्याचा सामना करताना देशासाठी बलिदान देणाऱ्या भारतमातेच्या सुपुत्रांची माहिती लष्कराने प्रसिद्ध केली आहे.
लष्कराकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार चीनच्या सैनिकांचा सामन करताना वीरमरण आलेल्या लष्करी अधिकाऱ्याचे नाव कर्नल संतोष बाबू असून, ते १६-बिहार रेजिमेंटमध्ये सेवेत होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत. संतोष यांना वीरमरण आल्याची माहिती लष्कराकडून दुपारी देण्यात आल्याचे त्यांच्या आईने सांगितले.
संतोष यांच्यासोबत दोन जवानांना वीरमर आले आहे. त्यातील एक जवान कुंदन ओझा हे झारखंडमधील साहिबगंज जिल्ह्यातील डिहारी जिल्ह्यातील रहिवासी होते. ते बिहार रेजिमेंटमध्ये सेवेत होते. लष्कराने कुटुंबीयांना त्यांच्या बलिदानाची माहिती दिली आहे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांनी त्यांच्या निधनाबाबत दुःख व्यक्त केले आहे. तर या चकमकीत वीरमरण आलेल्या दुसऱ्या जवानचे नाव पलनी असून, ते तामिळनाडूमधील रहिवासी होते. पलनी हे गेल्या २२ वर्षांपासून लष्करी सेवेत होते. त्यांच्या भावाने त्यांच्या मृत्यूची माहिती दिली आहे. तसेच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही त्यांच्या निधनाबाबत दुःख व्यक्त केले आहे.