नवी दिल्ली : देशाच्या अंतर्गत सुरक्षेला आव्हान देणाऱ्या २६/११ च्या हल्ल्याची पुनरावृत्ती दिल्लीत करण्याचा अतिरेकी कट पोलिसांनी सोमवारी उद्ध्वस्त केला. आसाम व दिल्ली पोलिसांनी मिळून तीन दहशतवाद्यांना अटक केली. या संयुक्त कारवाईत दहशतवाद्यांना आसाममधील गोवालपारा जिल्ह्यातून ताब्यात घेतले. दहशतवादी इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याची प्राथमिक माहिती आहे.दिल्लीचे पोलीस उपायुक्त प्रमोद कुशवाह यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी पार पडली. मुकदीर इस्लाम, रंजीत अली व जमील अशी तिघा आरोपींची नावे आहेत. तिघांचेही वय पंचविशीच्या आत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस त्यांच्या म्होरक्याचा शोध घेत आहेत. संशयितांकडून पोलिसांनी एक किलो स्फोटके, एक तलवार व एक चाकू जप्त केला आहे.दहशतवादी तरुण एकत्र शिकणारे असून, ते काही काळ दिल्लीतही होते. दिल्लीतच त्यांचा संपर्क दहशतवादी संघटनेशी आला. त्यानंतरच त्यांनी दिल्लीत घातपाताची योजना आखली होती. सुरक्षा यंत्रणांची नजर चुकवण्यासाठी त्यांनी गोवालपारा गाठले. आसाम पोलीस त्यांच्या मागावरच होते.
दिल्लीमध्ये घातपाताचा कट उद्ध्वस्त; तिघे अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 6:33 AM