मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उसळला आहे.जिरीबाम जिल्ह्यातील तीन लोकांच्या हत्येप्रकरणी मोठा गोंधळ उडाला आहे. शनिवारी इंफाळमध्ये आंदोलकांनी दोन मंत्री आणि तीन आमदारांच्या निवासस्थानावर धडक दिली आणि आमदारांच्या घरांवर जमावाने केलेल्या हल्ल्यानंतर इंफाळ पश्चिम प्रशासनाने जिल्ह्यात अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू केली आहे.
इंफाळ पश्चिम जिल्हा दंडाधिकारी टी किरणकुमार यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, शनिवारी दुपारी ४.३० वाजल्यापासून कर्फ्यू लागू करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, लम्फेल सनकेथेल भागातील आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री सपम रंजन यांच्या निवासस्थानावर जमावाने हल्ला केला.
लॅम्फेल सनकेथेल डेव्हलपमेंट अथॉरिटीचे प्रतिनिधी डेव्हिड यांनी दिलेली माहिती अशी, सपम यांनी आम्हाला आश्वासन दिले की, तीन लोकांच्या हत्येशी संबंधित मुद्द्यांवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा केली जाईल आणि जर सरकार जनतेच्या भावनांचा आदर करू शकले नाही तर मंत्री राजीनामा देतील . आंदोलकांनी ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्री एल सुसिंद्रो सिंह यांच्या घरावरही हल्ला केला.
इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील सगोलबंद भागात भाजप आमदार आरके इमो यांच्या घरासमोर आंदोलक जमले आणि घोषणाबाजी केली. इमो हे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांचे जावई देखील आहेत. तीन लोकांच्या हत्येवर त्यांनी सरकारकडून योग्य उत्तर देण्याची मागणी केली आणि २४ तासांच्या आत दोषींना अटक करण्याची विनंती केली.
केशमथोंग मतदारसंघातील अपक्ष आमदार सपम निशिकांत सिंह यांना त्यांच्या तिड्डीम रोड येथील निवासस्थानी भेटण्यासाठी आलेल्या आंदोलकांनी त्यांच्या मालकीच्या स्थानिक वृत्तपत्राच्या कार्यालयाच्या इमारतीला लक्ष्य केले, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने एजन्सीला सांगितले. जमावाने कार्यालयाच्या इमारतीसमोरील काही तात्पुरत्या बांधकामांची नासधूस केली.
मणिपूर-आसाम सीमेवर जिरी आणि बराक नद्यांच्या संगमाजवळ शुक्रवारी रात्री जिरीबाम जिल्ह्यातील सहा बेपत्ता लोकांपैकी तीन मृतदेह सापडले. जिरीबाम जिल्ह्यातील बोरोबेकरा येथून १६ किलोमीटर अंतरावर एक महिला आणि दोन मुलांचे मृतदेह सापडले, ज्या ठिकाणी सोमवारी सहा जण बेपत्ता झाले होते.