नवी दिल्ली - सिलचर-तिरुवनंतपुरम एक्स्प्रेसला रविवारी (9 जून) भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. एक्स्प्रेसच्या तीन डब्यांना आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सिलचरवरून ही एक्स्प्रेस निघण्याआधी कोचच्या साफसफाईसाठी पिट लाईनवर उभी होती. त्यानंतर काही वेळातचं ट्रेनमधून धूर बाहेर येत असल्याचं लक्षात आलं.
मिळालेल्या माहितीनुसार, सिलचर-तिरुवनंतपुरम एक्स्प्रेसच्या एकाच डब्यातून सुरुवातीला आग लागल्याने धूर बाहेर येत होता. मात्र काही वेळाने ही आग पसरली आणि तीन डब्यांना भीषण आग लागली. एक्स्प्रेसला आग लागल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आगीची माहिती मिळताच सिलचर अग्निशमन दल व राज्य आपत्ती नियंत्रण दल (एसडीआरएफ) घटनास्थळी दाखल झाले व आगीवर नियंत्रण मिळवण्याचे कार्य सुरू झाले. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.